
होम मिनिस्टर कार्यक्रमातून आदेश बांदेकर यांनी चाहत्यांची मनं जिंकली आहे. घराघरात ते सगळ्यांचे लाडके भाऊजी झाले आहेत. ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी कलाकारांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच कलाकारांना पोहचवणाऱ्यांना आता पोहचवण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आपली तब्येत व्यवस्थित आहे. कोणीही काळजी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मिडीयावर लाइक आणि सबस्काईब आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्यात येत आहे. हे फक्त आपल्यापुरते मर्यादीत होते, तेव्हा हा विषय आपण हसण्यावर नेला. मात्र, मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांबाबत अशा खोट्या बातम्या पसरवण्यात येत आहे. या वृत्तीला आळा घालण्याची वेळ आली आहे. या वृत्तीला श्रद्धांजली वाहावी, असं मला मनापासून वाटतं. 20-25 मराठी सेलिब्रिटींबाबत अशी माहिती स्वत:च्या पेजवरुन टाकणाऱ्या वृत्तीला मी श्रद्धांजली अर्पण करतो,असेही त्यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “नमस्कार, मी आदेश बांदेकर…मी अत्यंत व्यवस्थित आहे आणि सुदृढ, सुखरुप प्रवास करतो आहे. कारण, इतक्या जणांचे मला फोन येत्यात…अत्यंत काळजीपोटी, प्रेमापोटी…आणि जे संपर्क साधू शकत नाहीयेत म्हणून हळहळ व्यक्त करत्यात. कारणही तसंच आहे. आपले खूप हितचिंतक असतात. तसंच कुणीतरी अत्यंत अतृप्त भावनेने वेगवेगळ्या बातम्या पसरवतं. आता ही वृत्ती आहे. याला कुणीच काही करू शकत नाही. पण, बातम्या पसरवत असताना अगदी आदेश बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले इथपासून ते अगदी निधनापर्यंत…म्हणजे श्रद्धांजलीही काही जणांनी अर्पण केल्यासारखी ही भावना ही वृत्ती…माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं. मी या सगळ्या गोष्टीकडे हसण्यावारी दुर्लक्ष केलं”.
“पण, आता मी सोशल मीडियावर पाहिलं तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज, कलावंत जे काम करत्यात त्यांच्या बद्दलच्या बातम्यादेखील अशाच होत्या. म्हणजे कुणाचा घाटात अपघात, कुणाच्या बसलाच अपघात…म्हणजे थेट पोहोचवण्यापर्यंत…आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे, असं मला वाटतं. हे पोहोचवायचं असेल तर ही वृत्ती नाहीशी व्हायला पाहिजे. आणि ही वृत्ती नाहीशी करायची असेल तर व्ह्यू वाढवण्यासाठी इतरांच्या नावाचा वापर करून चार पैसे कमवण्याचा धंदा बंद पाडायचा असेल तर यांना रिपोर्ट केलं पाहिजे. ही वृत्ती अत्यंत घातक आहे. यामुळे कोणाच तरी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या वृत्तीला श्रद्धांजली वाहावी, असं मला मनापासून वाटतं. २०-२५ मराठी सेलिब्रिटींबाबत अशी माहिती स्वत:च्या पेजवरुन टाकणाऱ्या वृत्तीला मी श्रद्धांजली अर्पण करतो. हसावं नाही तर काय करावं? ज्यांनी काळजी पोटी फोन केला त्या सगळ्यांना सांगतो मी व्यवस्थित आहे”, असं त्यांनी स्पष्ट करत ही वृत्ती संपवण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. तसेच आपण सुखरुप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.