वाहनचालकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत अनेकवेळा सिग्नलवर वाहतूक पोलीस आपल्या खासगी मोबाईलवरून वाहनांचे फोटो काढताना दिसतात. स्वतःच्या खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे. मात्र अनेक वाहतूक पोलीस बऱ्याचदा हे नियम पाळताना दिसत नाही. मात्र यापुढे अशा प्रकारे खासगी मोबाईलने एखाद्या वाहनाचा पोलिसांनी फोटो काढल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत स्वतः अप्पर पोलीस आयुक्त (वाहतूक) एम. रामकुमार यांनी माहिती दिली आहे.
ई-चलन मशीन दिलेली असतानाही वाहतूक पोलीस सर्रास आपल्या खासगी मोबाईलने फोटो काढताना दिसतात. यातच अनेकवेळा वाहनचालकाला आपल्यावर कारवाई का केली जात आहे, हेही कळत नाही. वाहतूक पोलिसांनी आपल्या खासगी मोबाईलने वाहनाचे फोटो टिपल्यानंतर वाहनचालकांच्या घरीच दंडाचे चलन पाठवले जाते. मात्र अशा प्रकारे आता वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली जाणार आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त (वाहतूक) एम. रामकुमार म्हणाले आहेत की, स्वतःच्या खासगी मोबाईलचा वापर करून वाहनाचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे. अशा प्रकारे फोटो काढल्यास संबंधित वाहतूक पोलिसावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत वाहनचालकांनी तक्रार करावी, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, अशा प्रकारचे आदेश दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी दिले होते. मात्र त्याचे पालन अनेक पोलिसांकडून होताना दिसले नाही. मात्र आता तरी या नियमाचे पालन होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.