मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान मिंध्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या नगरविकास खात्याच्या दुर्लक्षामुळे अंधेरीत गटारात पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या आपद्ग्रस्त कुटुंबीयांची आज शिवसेना आमदार ऋतुजा लटके यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगत शिवसेना तुमच्या पाठीशी ठाम असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पवईच्या मिलिंद नगरमध्ये वास्तव्याला असलेल्या विमल गायकवाड या बुधवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास सिप्झ परिसरातील कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. येथील रस्त्यावरील एका ड्रेनेज लाईन उघडण्यात आली होती. हे गटार बंद करण्यासाठी पालिकेने मेट्रोला 11 जुलैला पत्र दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली. त्यामुळे शिवसेनेने दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.