भाडेकराराचा भंग तसेच वीज आणि पाण्याचे पैसे थकवल्याने अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलातील हॉस्टेलवर कारवाई करत 18 खोल्या आज बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानकडून सील करण्यात आल्या. हॉस्टेलच्या एकूण 22 खोल्या असून 18 खोल्या सील करण्यात आल्या आहेत.
बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात हॉस्टेल इमारतीतील 22 सदनिका युनायटेड मार्केटिंग अँड रीसर्च ब्युरो या संस्थेला भाडेकरारावर देण्यात आल्या होत्या. परंतु या सर्व खोल्यांचे भाडे तसेच वीज आणि पाण्याचे बिल न भरल्याने प्रतिष्ठानच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस येथील हॉस्टेलमध्ये चिकटवण्यात आली. त्यानंतर आज या सर्व सदनिका रिकाम्या करून घेण्याची कार्यवाही प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली. 22 पैकी 18 खोल्या सील करण्यात आल्या असून उर्वरित खोल्याही सील केल्या जाणार असल्याचे समजते.