महायुतीला लाडकी बहीण, भाऊ आणि शेतकरी नकोय, फक्त लाडके मित्र हवेत – वर्षा गायकवाड

महायुतीकडून विधानसभा निवडणुकीत ज्या योजनेचा सर्वाधिक गाजावाजा करण्यात आला त्या ‘लाडकी बहीण योजने’तून आता अनेक अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई सुरू झाली आहे. तसेच या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या सुमारे 50 लाखांहून महिलांना याचा लाभ मिळणं बंद होऊ शकतं. यावरूनच आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महायुती सरकारला लक्ष्य केलं आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ”महायुतीला लाडकी बहीण, भाऊ आणि शेतकरी नकोय, फक्त लाडके मित्र हवेत.” X वर एक पोस्ट करत त्या असं म्हणल्या आहेत.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ”सत्तेच्या लालसेपोटी विधानसभा निवडणुकीत या जुमलेबाज सरकारने लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला. आता निवडणूक संपली. आता यांना लाडकी बहीण नको, लाडके भाऊ नको, लाडके शेतकरी नको, फक्त आपले लाडके मित्र हवेत. त्यामुळे आता जनतेच्या या योजनांना कात्री लावण्याचे पाप सरकार करत आहे. ही सरळ सरळ बेईमानी नाही तर काय आहे?”

वर्षा गायकवाड म्हणाल्या, ”जेव्हा आमच्या माता-भगिनींची मते हवीशी वाटत होती, तेव्हा कुठलेही निकष लावले नाहीत. तर आता कसले निकष लावून लाभार्थी माता भगिनींच्या नावावर फुली मारण्याचा कट रचत आहात? ही आमच्या राज्यातील महिलांची फसवणूक नाही का?”

त्या पुढे म्हणाल्या, ”लाडक्या सत्तेसाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अव्वाच्या सव्वाच्या योजना जाहीर करून तिजोरीवर ताण आणला आणि आता तिजोरीवर भार येतोय, असे कारण देऊन पुन्हा जनतेचीच लुट करतयं, हे सत्तापिपासू सरकार.”