वाई नगरपालिकेने थकीत मालमत्ताकर वसुलीच्या धडाकेबाज कारवाईनंतर आता मुख्याधिकारी संजीवनी दळवी या ऍक्शन मोडमध्ये आल्या असून, त्यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर हातोडा चालविण्यास सुरुवात केली आहे.
शहरात नगरपालिकाहद्दीत बेकायदेशीर होर्डिंग्ज उभारून कित्येक वर्षे वाईकरांना व नगरपालिका प्रशासनाला चुना लावून हजारो रुपयांचा कर बुडवणाऱयांना हिसका दाखविला आहे. नगरपालिका प्रशासनाचा कर चुकवून व फसवून शहराचे विद्रुपीकरण करणाऱया होर्डिंग्जवर वाई नगरपालिकेने हातोडा टाकला.
किसन वीर चौक, वाई एसटी स्टँड व शहरामधील अन्य परिसरात नगरपालिका मालकीच्या मोक्याच्या जागेवर स्वमालकी प्रस्थापित करून जागा बळकावल्या होत्या. नगरपालिका प्रशासनाला एक रुपया भाडे न देता सदर जागेवर दररोज जाहिरातीचे फलक झळकत होते. आतापर्यंत याचा एक रुपयाही नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जमा केला जात नव्हता. होर्डिंग्जवर हातोडा फिरवल्यानंतर वाईकरांच्या समोर गौडबंगाल उघड झाले आहे.
वाई शहरातील पार्किंग व्यवस्था, अस्ताव्यस्त बाजारपेठ व भाजी मंडई, मुख्य रस्त्यावरील दुकानदारांचे अतिक्रमण तसेच आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणांबाबत मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी कडक निर्णय घ्यावेत, अशी मागणी वाईकर करत आहेत.