
बोगस रेरा नोंदणी घेऊन कल्याण – डोंबिवलीत उभारलेल्या 65 बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पालिकेने या इमारतींवर हातोडा चालवण्याची तयारी सुरू केली असतानाच बोगस कागदपत्रे बनवणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळला जाणार असून शालीन भगत या मुख्य आरोपीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.
नागरिकांची घरे वाचवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याणचे प्रांताधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
प्रांताधिकारी गुजर यांनी या प्रकरणात खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले होते. तहसीलदार शेजाळ यांनी खोटी कागदपत्रे तयार करणारे साई डेव्हलपर्सचे भागीदार शालीन भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश रामनगर पोलिसांना दिले होते. यानंतर भगत याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.
65 बेकायदा बांधकाम प्रकरणात संबंधित बिल्डरांनी खोटी कागदपत्रे तयार केली आहेत. या टोळीवर एमपीडीए कारवाई झाली पाहिजे. शालीन भगत हा प्यादा आहे. त्याच्या ‘आका’ला पाहिजे, अशी मागणी आम्ही मनेरे यांची भेट घेऊन अटक झाली डीसीपी पराग केली आहे.
– दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख