बेकायदा बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या भिवंडी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे, आयुक्तांचे प्रशासनाला सक्त आदेश

निवडणुकीच्या कामासाठी गेले दोन महिने ऑनड्युटी असलेले अधिकारी आणि कर्मचारी आता निवडणूक संपल्याने भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयात परतले आहेत. त्यामुळे गेले दोन महिने थंडावलेली बेकायदा बांधकामांवरील कारवाई पुन्हा वेगात सुरू होणार आहे. यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांनी तसे सक्त आदेशच जारी केले आहेत.

निवडणूक आचारसंहिता जारी होण्याच्या आधीपासूनच भिवंडी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी व्यस्त झाले होते. त्यामुळे गेले दोन महिने महापालिकेचे कामकाज थंडावले होते, परंतु निवडणुका संपताच पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी तातडीने बैठक आयोजित केली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (अनधिकृत बांधकाम) विठ्ठल डाके यांच्यासह बीट निरीक्षक सहाय्यक विधी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आयुक्तांनी शहरातील सर्व बेकायदा बांधकामे, बॅनर्स आणि होर्डिंग्ज यांचा आढावा घेतला.

  1. शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे पुढील तीन महिन्यांत जमीनदोस्त करण्याचा सविस्तर कृती आराखडा सात दिवसांत सर्व प्रभाग अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त यांनी सादर करावा.
  2. ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत त्या प्रभागातील शहानिशा अधिकाऱ्यांमार्फत कागदपत्रांची पडताळणी करून बांधकाम बेकायदा आढळल्यास ते तातडीने जमीनदोस्त करावे.
  3. ज्या प्रकरणात न्यायालयाने आदेश पारित केले आहेत त्या बांधकामांवर विनाविलंब कारवाई करावी.
  4. एखाद्या प्रभागातील अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक विलंब केला तर त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा.
  5. ज्या बांधकामांबाबत न्यायालयाने जैसे थे परिस्थिती अथवा स्थगन आदेश दिले असतील त्या बांधकामांचे सद्यस्थितीतील चित्रीकरण करून संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा. तसेच त्या ठिकाणी कोणतेही वाढीव अनधिकृत बांधकाम होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  6. न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत प्रभाग अधिकाऱ्यांनी पुढील सात दिवसांत कार्यवाही न केल्यास त्यांच्याविरुद्ध उपायुक्त (मुख्यालय) यांनी सक्त कारवाई करावी.
  7. निवडणुकीच्या कारवाईत जे अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर लागले आहेत ते तत्काळ काढून गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधितांची माहिती संकलित करावी.