
100, 200 आणि 500 रुपये किमतीच्या बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा डाव गुन्हे शाखेने उधळून लावला. बनावट नोटा बाजारात येण्याआधीच पोलिसांनी त्या जप्त करून त्या नोटा घेऊन आलेल्या चौघांना पकडले. तब्बल सात लाख 10 हजार किमतीच्या चार हजार 300 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
एक टोळी बनावट नोटा घेऊन मानखुर्द परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-10 चे सहाय्यक फौजदार कांबळे यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुतार, सपोनि चौधरी, तोडकर तसेच कांबळे, खरात, जगताप, डफळे, चव्हाण या पथकाने मानखुर्द परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार एक टोळी लाल रंगाच्या कारमधून बनावट नोटा विकण्यासाठी महामार्गावर येताच पथकाने कार थांबवली. कारची झडती घेतली असता 100 रुपये दराच्या 1600 नोटा, 200 रुपये दराच्या 2,400 नोटा आणि 500 रुपये दराच्या 300 बनावट नोटा मिळून आल्या. त्या नोटा जप्त करून त्या चलनात आणण्यासाठी घेऊन आलेल्या शाहनवाज शिरलकर (50), राजेंद्र खेतले (43), संदीप निवाळकर (40) आणि ऋषिकेश निवाळकर (26) अशा चौघांना पकडले. त्यांच्याकडील सात लाख 10 हजारांच्या बनावट नोटा, गुह्यात वापरलेली कार आणि चार मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आरोपींनी या बनावट नोटा कुठून आणल्या. त्या कुठे छापल्या, याआधी त्या कुठे चलनात आणल्यात का, तसेच या रॅकेटमध्ये अजून कोण आहेत आदीचा पोलीस तपास करीत आहेत.