अॅक्रोबॅटिक्स, एरोबिक्सवरही अन्याय, क्रीडा खात्याच्या जुलमी निर्णयाचा जिम्नॅस्टिक्सच्या उपप्रकारांनाही फटका

राज्य सरकारच्या क्रीडा खात्याच्या जुलमी निर्णयाचा फटका केवळ सात खेळांनाच नव्हे तर जिम्नॅस्टिक्सचे उपप्रकार असलेल्या अॅक्रोबॅटिक्स आणि एरोबिक्स या खेळांनाही बसला आहे. क्रीडा खात्याने या दोन्ही उपप्रकारांनाही शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या यादीतून वगळण्याचा निर्णय जाहीर केल्याचे समोर आले आहे.

चार दिवसांपूर्वी राज्याच्या क्रीडा विभागाने राज्यात खेळाचा प्रचार-प्रसार होत नसल्याचे कारण पुढे करत अश्वारोहण, गोल्फ आणि नौकानयन या जागतिक स्तरावर असलेल्या खेळांना वगळण्याचा पराक्रम केला होता. तसेच महाराष्ट्रात प्रचंड लोकाश्रय आणि लोकप्रिय असलेल्या शरीरसौष्ठव, पॅरम या खेळांसह पॉवरलिफ्टिंग, बिलियर्ड्स आणि स्नूकर या खेळांना ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्थान नसल्याचे कारण पुढे करत या खेळांचाही पत्ता कट करण्याचे धाडस दाखवले होते. पण क्रीडा खात्याने सात नव्हे तर नऊ खेळांना पुरस्काराच्या यादीतून हद्दपार केले आहे. अॅक्रोबॅटिक्स आणि एरोबिक्स हे दोन उपप्रकार सर्व खेळांची जननी असलेल्या जिम्नॅस्टिकचे उपप्रकार आहेत आणि जगभरात या खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.

न्यायासाठी न्यायालयाचेही दरवाजे ठोठवू

क्रीडा खात्याने जिम्नॅस्टिकचे उपप्रकार असलेल्या अॅक्रोबॅटिक्स आणि एरोबिक्स यांना पुरस्काराच्या यादीतून काढण्याचा घेतलेला निर्णय निव्वळ चुकीचा नसून मूर्खपणाचा आहे. आमच्या खेळावर आधीच अनेक पातळय़ांवर अन्याय होतच होता. राज्याच्या क्रीडा खात्याने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या यादीतून आमच्या खेळांना वगळून त्यांनी आमच्या भळभळणाऱया जखमांवर मीठ चोळले आहे. या निर्णयाविरुद्ध राज्य क्रीडा खात्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. त्यांनी त्वरित आमच्या खेळाला पुरस्काराच्या यादीत स्थान द्यावे. आमच्या खेळाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी न्यायालयाचे दारही ठोठवू.

संजय शेटये, अध्यक्ष, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना.

थोडेसे खेळाबद्दल

जिम्नॅस्टिक्समध्ये आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, रिदमिक जिम्नॅस्टिक्स, ट्रम्पोलिन जिम्नॅस्टिक्स, अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स, अॅरोबिक्स जिम्नॅस्टिक्स असे पाच उपप्रकार आहेत. त्यापैकी आर्टिस्टिक्स आणि रिदमिकला दरवर्षी एक तर ट्रंपोलिन, अॅक्रोबॅटिक्स आणि अॅरोबिक्स यांना चक्राकार (आलटून-पालटून) पद्धतीने दरवर्षी पुरस्कार देण्याची पद्धत होती. त्यामुळे अॅक्रोबॅटिक्स आणि अॅरोबिक्समध्ये अनेक दिग्गजांना राज्याचा क्रीडा पुरस्कार अनेक वर्षे मिळत आला आहे, मात्र यापुढे तो मिळणार नाही.

या खेळांचे काय अस्तित्व?

एकीकडे कॅरम, शरीरसौष्ठवसारख्या जनमानसात लोकप्रिय असलेल्या खेळांना वगळण्यात आलेय. या खेळांच्या राज्यातील सर्वच जिह्यांमध्ये संघटना आहेत. मात्र महाराष्ट्राच्या क्रीडा जगतात अस्तित्वच नसलेल्या मॉडर्न पॅण्टाथलॉन, रग्बी सेव्हन, स्पोर्ट्स क्लायबिंग आणि आटय़ापाटय़ा या खेळांना स्थान दिले गेले आहेत. या खेळांच्या स्पर्धा कधी होतात? कुठे होतात ? या खेळाचे खेळाडू कुठे असतात? कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता नसतानाही हे खेळ क्रीडा पुरस्काराच्या यादीत कायम कसे? हा प्रश्न साऱयांनाच पडला आहे.