बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यांची हत्या होऊन आज 22 दिवस झाले असून अद्यापही काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून करण्यात येत आहे. यातच आज संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सीआयडी आधीक्षकांनी विश्वास दिला आहे की, पुढील एक दोन दिवसांत आरोपींना अटक करण्यात येईल.
धनंजय देशमुख म्हणाले की, वाल्मीक कराड यांचे निकटवर्तीय ज्योती जाधव यांची देखील सीआयडीकडून चौकशी सुरू आहे, अशी माहिती सीआयडी आधीक्षकांनी दिली आहे. ते म्हणाले, माझा भाऊ संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील, त्यांना अटक व्हावी, ही माझी मागणी आहे.
वाल्मीक कराडचे शेवटचे लोकेशन उज्जैन
दरम्यान, संतोष देशमुख हत्या, तसेच खंडणीच्या गुन्ह्यातही पोलिसांना हवा असलेला वाल्मीक कराड अद्यापही फरार आहे. वाल्मीक कराडच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन 13 डिसेंबरला मध्य प्रदेशमधील उज्जैनचे असल्याचे समोर आले आहे. पोलीस अद्यापही त्याचा शोध घेत आहेत.