परदेशात इंजिनीअरिंगचे आरोपीला घेता येणार शिक्षण, हायकोर्टाने रद्द केला गांजा ओढल्याचा खटला; पोलिसांच्या तपासावर संशय

परदेशात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या आरोपीविरोधातील गांजा ओढल्याचा खटला न्यायालयाने रद्द केला. राहुल शर्मा असे या आरोपीचे नाव आहे. परदेशात शिक्षण घ्यायचे आहे. गांजा ओढल्याच्या खटल्याचा अडथळा आहे. मुळात माझ्याविरोधात पोलिसांकडे ठोस पुरावाच नाही. हा खटला रद्द करावा, अशी मागणी शर्माने याचिकेत केली होती. न्या. सारंग कोतवाल व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने ही मागणी मान्य केली. या गुह्याचे सबळ पुरावे पोलिसांकडे नाहीत. पोलिसांचा तपासच संशायस्पद आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

काय आहे प्रकरण

वसईतील माणिकपूर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्या हद्दीत अमली पदार्थ्यांचे सेवन केले जाणार असल्याची माहिती 7 फेब्रुवारी 2021 रोजी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सन सिटी परिसरात गस्त घातली. तेथील मंदिराजवळ दोघे गांजा ओढत असल्याचे पोलिसांना कळाले. राहुलचे डोळे पोलिसांना अस्थिर दिसले. पोलिसांनी त्याला विचारले, काय करत होतास. त्याने सांगितले, गांजा ओढत होतो. अशी ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार गुह्याचीही नोंद करण्यात आली.

गांजाचा पुरावाच नष्ट केला

राहुलने गांजा ओढलेला पाईप, तंबाखू मिश्रित गांजा, माचिस बॉक्स या सर्व गोष्टी पोलिसांनी नष्ट केल्या. त्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. महत्त्वाचे म्हणजे राहुलची अंगझडती घेण्यात आली. त्यात पोलिसांना काहीच सापडले नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

दुसऱ्या व्यक्तीचा तपशीलच नाही

राहुलसोबत अजून एक व्यक्ती गांजा ओढत होती, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र या व्यक्तीचे पुढे काय झाले याचा तपशील नोंदवलेल्या गुह्यात व आरोपपत्रातही नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

कायद्याचा अपमान होईल

राहुल गांजा ओढत होता याचा कोणताही पुरावा नाही. त्याच्या विरोधात वसई कोर्टातील खटला सुरू ठेवल्यास कायद्याचा अपमान होईल. कारण पुरावाच नसल्याने राहुलला शिक्षाच होणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.