मुंबईतून तडीपार केलेल्या आरोपीने साकीनाका येथे येऊन पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली. पीयुषकुमार नायडू (25) असे त्याचे नाव असून साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
त्याच्याविरोधात यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत, तसेच पाच प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. साकीनाका येथील रहिवासी असलेल्या नायडूला पोलिसांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात एका वर्षासाठी तडीपार केले होते. तरीही शनिवारी तो साकीनाका येथील घरी आला. वडील व दोन भावांसोबत वाद घालून त्यांना मारहाण करू लागला. त्यामुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी येऊन त्याला ताब्यात घेतले व समजावण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र उलट तो पोलिसांना शिवीगाळ करू लागला. त्याने पोलीस अंमलदार उमेश सोनावणे (50) यांची कॉलर पकडून त्यांना खाली पाडले व त्यांच्यावरही हल्ला केला. या वेळी तेथे उपस्थित दोन पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली. नायडूचा अतिरेक वाढू लागल्याने पोलिसांनी त्याला पकडून नेले.