4300 कोटय़धीश हिंदुस्थान सोडणार

हिंदुस्थानात श्रीमंतांची संख्या वाढत असली तरी देश सोडून जाणाऱया कोटय़धीशांच्या संख्येतही वाढ होतेय. एका अहवालानुसार, यंदा 4300 करोडपती हिंदुस्थान सोडून अन्य देशांत स्थायिक होण्याचा अंदाज आहे. यासंदर्भातील अहवाल हेन्ले अँड पार्टनर्स या विदेशी गुंतवणूक कंपनीने नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार या वर्षी जगभरातील एक लाख 28 हजार करोडपती नव्या देशांमध्ये राहायला जाऊ शकतात, तर हिंदुस्थानातील चार हजारांहून अधिक करोडपती विदेशात स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, बहुतांश लोक यूएई आणि यूएसएमध्ये स्थायिक होण्याला प्राधान्य देत आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने कोटय़धीश लोक विदेशात जात असले तरी तेवढय़ाच संख्येने करोडपती  आपल्या देशात बनत आहेत. देशाबाहेर गेले तरी त्यांची संपत्ती आणि व्यापार हिंदुस्थानात असतोच.

चीनची आघाडी

चीन आणि युव्रेननंतर कोटय़धीशांचे स्थलांतर होणाऱया देशांमध्ये हिंदुस्थानचा क्रमांक तिसरा आहे. कोटय़धीशांच्या संख्येत चीन अजूनही हिंदुस्थानच्या पुढे आहे. चीनमधून यंदा सर्वाधिक म्हणजे 15 हजार 200 करोडपती देश सोडतील, असा अंदाज आहे.