कसाऱ्यातील विहीगाव-खोडाळे मार्गावर भीषण अपघात; जीप 200 फूट खोल दरीत कोसळून वृद्ध ठार, आठ जखमी

विहीगाव-खोडाळे मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. माळ गावातून खोडाळेकडे जाणारी जीप अपर वैतरणा धरणावरील पुलाअगोदर दोनशे फूट खोल दरीत कोसळली. त्यात एक वृद्ध जागीच ठार झाला असून आठ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खर्डी, इगतपुरी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. जीपचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहे.

कसाऱ्याजवळील माळ गावात राहणारे झुगरे कुटुंबीय घरगुती कामासाठी खोडाळा येथे जीपने जाण्यासाठी सकाळी निघाले. या जीपमध्ये आठ ते दहा जण प्रवास करीत होते. विहीगाव सोडल्यानंतर एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप काही क्षणातच खोल दरीत कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की जीप कोलांट्या घेत धरण पात्राजवळ एका खडकावर जाऊन अडकली. सर्वजण जीवाच्या आकांताने ओरडत होते.

या अपघातात दादू झुगरे (65) हा वृद्ध प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर भारती झुगरे, सुरेश ठोंबरे, उषा झुगरे, अतिश झुगरे, अंकिता झुगरे, आदित्य झुगरे, पातळी झुगरे, सन्या झुगरे असे एकाच कुटुंबातील आठ जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचे वृत्त समजताच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य देवीदास अबिवले, किरण निरगुडे, गणेश वाघ, देवा वाघ आदींनी तातडीने धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने दरीत पडलेली जीप व जखमींना सुरक्षितरीत्या बाहेर काढले.