पंधराशे नको, सुरक्षा द्या ! शिक्रापूर-चाकण मार्गावर झालेल्या अपघाताप्रकरणी ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर शाळेमध्ये मुलाला सोडायला चाललेल्या पित्यासह दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने पिंपळे जगताप ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी शोकसभा घेत रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांनी गावची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश खेडकरसह त्याच्या तन्मय व शिवम या दोन बालकांचा अपघातात मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी शोकसभा घेत रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेतला, यावेळी सरपंच सोनाली नाईकनवरे, अशोक जगताप, रमेश टाकळकर, पोलीसपाटील वर्षा थिटे, जयेश शिंदे, भगवान शेळके, चंदन सोंडेकर, अशोक शेळके, सागर शितोळे, महेश जगताप, ज्ञानेश्वर शितोळे अक्षय सोंडेकर, स्वप्नील शेळके, रामदास सोंडेकर, शिवाजी जगताप, नीलेश फडतरे, सविता थिटे, स्वाती वळसे, मनीषा तांबे, रेश्मा कुसेकर, निर्मला दौंडकर, स्वाती वळसे, मनीषा तांबे, निर्मला वळसे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते, सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिले.

या दुर्दैवी घटनेमुळे गावची येणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, रोहिणी सोनावले, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पंडित मांजरे यांच्या देखरेखीखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पंधराशे नको; मात्र सुरक्षा द्या! 

पिंपळे जगताप येथील आंदोलनादरम्यान संतप्त आक्रमक महिलांनी पुढारी फक्त मते मागायला येतात, असे सांगत आम्हाला शासनाचे पंधराशे नको; मात्र सुरक्षा हवी, अशी विनंती शासनाकडे केली आहे.

पिंपळे जगतापमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातामध्ये एका युवकासह त्याच्या दोन बालकांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदय पिळवणारी घटना घडूनदेखील अद्याप कोणताही लोकप्रतिनिधी या कुटुंबाकडे फिरकला नसल्याची खंत चंदन सोंडेकर यांनी व्यक्त केली.