शीव सर्कल येथील उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने दुचाकी चालविणे एकाच्या जिवावर बेतल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातात अन्य चौघे तरुण गंभीर जखमी झाले. शीव पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.
बुधवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास शीव सर्कल येथील उड्डाणपुलावर शिवरंजनी इमारतीसमोर दोन दुचाकीमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत एका दुचाकीवरील तरुण उड्डाणपुलावरून खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर दोन्ही दुचाकीवरील चौघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विघ्नेश सरवदे (20) हा तरुण ऑक्टिव्हा दुचाकी उड्डाणपुलावरून विरुद्ध दिशेने चालवत होता. त्याच वेळी समोरून येणाऱ्या बेनाली दुचाकीला त्याने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यात ऑक्टिव्हा दुचाकीवरील अनिमेश मोरे (23) या तरुणाचा मृत्यू झाला, तर अमोल कुंचीकरवे (20), विघ्नेश सरवदे तसेच बेनाली दुचाकीवरील अश्फाक अन्सारी (28) आणि मेहंदी शहेनशाह सय्यद (30) असे चौघे गंभीर जखमी झाले. अन्सारी आणि सय्यद हे दोघे गोवंडी येथे राहतात, तर ऑक्टिव्हा दुचाकीवरील तिघेही विक्रोळीच्या टागोरनगर येथील रहिवासी आहेत.