भरधाव येणारा टँकर थेट ढाब्यात घुसल्याची भयंकर घटना आज दुपारी पोलादपूरच्या चोळई गावाजवळ घडली. टँकरचालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर ढाब्यात असलेल्या महिलेने प्रसंगावधान राखत वेळीच पळ काढल्याने जीवितहानी टळली.
टँकरचालक लक्ष्मीलाल मनेरिया हा रिकामा टँकर घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. दुपारी बाराच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरच्या चोळई गावाजवळ पोहोचला असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर थेट डाव्या बाजूला रस्त्यालगत असलेल्या सोना ढाब्यात जाऊन घुसला. भरधाव टँकर आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून महिलेने पळ काढल्याने तिचा जीव वाचला ही धडक इतकी जबर होती की चालकाच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्याला पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर काळभैरवनाथ रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. याचा अधिक तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत.