वरळी-वांद्रे सागरी सेतूवर कारची रेसिंग लावणे जिवघेणे ठरू शकते याची जाणीव असतानाही दोघा तरुणांनी ती चूक केल्याची घटना आज सकाळी घडली. मर्सिडीज व बीएमडब्ल्यू कारमध्ये ते तरुण रेसिंग लावत होते. एका ठिकाणी बाजूने जाणाऱ्या वॅगनर कारला त्या अलिशान गाड्या धडकल्या. परिणामी वॅगनर कार संरक्षक कठड्याला आदळून उलटीपलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही कार चालकांना ताब्यात घेतले आहे.
निसार (26) हा तरुण वॅगनर कार घेऊन सागरी सेतूवरून डाव्या बाजूने जात होता. तो उत्तर बाजूकडील खांबा क्रमांक 19 जवळ आला असता पाठीमागून वेगात आलेल्या मर्सिडीज व बीएमडब्ल्यू कार बाजूला आल्यावर एकमेकांना धडकल्या. त्यानंतर त्यांनी वॅगनर कारला धडक दिली. दरम्यान, या प्रकरणी निसार याने दिलेल्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी हयगय व बेदकारपणे गाडी चालवून अपघात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू कार चालकाला अटक केली आहे.