
गुजरातमधील अहमदाबादजवळील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठिकाणी अपघात झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. बांधकामा दरम्यान गर्डर लाँचर गॅन्ट्री लगतच्या रेल्वे ट्रकवर कोसळले. त्यामुळे वटवा-अहमदाबाद मार्गा दरम्यानच्या गाडय़ांवर परिणाम झाला. त्यापैकी 25 गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. रविवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. गर्डर दोन्ही चौकटीच्या मधोमध पडल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही, असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने सांगितले. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे 25 गाड्या रद्द करण्यात आल्या. पाच गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आला. व्रेनच्या मदतीने गर्डर हटवण्यात आली.