स्पोर्टबाईक-बुलेटची समोरासमोर धडक; माजी नगरसेवक वीरकर ठार

स्पोर्टबाईक एफझेड यामाहा तसेच बुलेटची समोरासमोर धडक झाली. या धडकेत माजी नगरसेवक अशोक गोरखनाथ वीरकर (55, रा. गुलमोहर कॉलनी, एन 5, सिडको) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात धूत हॉस्पिटलजवळील ब्रैंडी कंपनीसमोर गुरुवारी (दि. 20) रात्री 11 वाजता झाला. अपघातातील स्पोर्ट बाईकवरील शब्बीर अतिक शेख (18) आणि अमान इरफान शेख (18, दोघे रा. उर्दू शाळेसमोर पॉवरलूम) हे जखमी झाले आहेत.

धूत हॉस्पिटलकडून उत्तरानगरीकडे अशोक वीरकर हे बुलेट गाडीवरून (एमएच 20, जीएल 2122) जात होते. यावेळी यामाह स्पोर्टबाईकवर (एमएच 20, एचए 4468) अमान शेख, शब्बीर शेख हे दोघे पॉवरलूमकडून धूत हॉस्पिटलकडे येत होते. या दोन्ही गाड्यांची ब्रँडी कंपनीसमोर येताच समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही दुचाकी दूर जाऊन पडल्या तर वीरकर हे बाजूला फेकल्या गेल्याने ते बेशुद्ध झाले होते. तसेच शब्बीर शेख व अमान शेख हे देखील गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी पाठविले. जागीच बेशुद्ध झालेले अशोक वीरकर यांना एमआयडीसी सिडको ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक गिरी, उपनिरीक्षक पचलोरे, अंमलदार समाधान उबाळे, सांगळे यांच्या पथकाने रुग्णवाहिका बोलावून घेत घाटीत दाखल केले. उपचारादरम्यान पहाटे १ वाजेच्या सुमारास वीरकर यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात स्पोर्टबाईक गाडीवरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पठाण करीत आहेत.

दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर सेंट्रल नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे.