बॉलीवूड चित्रसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘सरदार-2’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या चित्रपटाच्या सेटवर भीषण अपघात झाला आहे. सेटवर स्टंटदरम्यान 20 फूटांवरून कोसळून स्टंटमॅनचा मृत्यू झाला आहे. एलुमलाई असे मृत्यू झालेल्या सीनियर स्टंटमॅनचे नाव आहे. या घटनेने सेटवरील सर्वांनाच याचा धक्का बसला आहे.
‘सरदार 2’ या चित्रपटाचे गेल्या दोन दिवसांपासून चित्रीकरण सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी एलुमलाई हे या चित्रपटासाठी स्टंट करत होते. स्टंट दरम्यान सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे 20 फूटावरून खाली कोसळले. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. विरुगंबक्कम पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
एलुमलाई यांनी रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित कुमार यांच्या अनेक सिनेमांमध्ये काम केले होते. त्याच्या अशा अपघाती निधनाने सेटवर सगळ्यांना धक्का बसला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
‘सरदार -2’ चित्रपटाची 12 जुलै रोजी मुहूर्त पूजा पार पडली होती आणि लगेचच 15 जुलैपासून चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. चेन्नईतील एलव्ही प्रसाद स्टुडिओत हे चित्रीकरण सुरू होते. यावेळी अभिनेते शिवकुमार, पीएस मथिरन, कार्थी आणि इतर क्रूचे सदस्य उपस्थित होते.