Mumbai accident – चालकाचा डोळा लागला अन् ट्रेलर अनियंत्रित झाला, जोरदार धडकेमुळे 6 गाड्या मिठी नदीच्या खाडीत पडल्या

मुंबईतील रहदारीचा रस्ता असलेल्या धारावी-माहीम जंक्शनजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका मोठ्या ट्रेलरने पाच ते सहा गाड्यांना धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की गाड्या मिठी नदीच्या खाडीत पडल्या. चालकाचा डोळा लागल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रेलरची धडक झाल्यामुळे टॅक्सी, टेम्पोसह पाच-सहा गाड्या मिठी नदीच्या खाडीत पडल्या. यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रेलरची धडक बसलेली वाहने खाडीकिनारी उभी होती. पहाटेच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ट्रेलरच्या धडकेमुळे वाहने खाडीत कोसळली.

यानंतर साहूनगर पोलीस आणि माहीम वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नुकसानीचा अंदाज घेतला. त्यानंतर अपघातस्थळावरून मोठा ट्रेलर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक छोटी क्रेन बोलावली आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. सध्या अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.