दिल्लीत निकालाआधी हाय व्होल्टेज ड्रामा; केजरीवाल यांच्या घरी ACB चं पथक धडकलं

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. मतमोजणीला काही तास बाकी असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथक (एसीबी) माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले आहे. कोणतीही नोटीस न घेता हे पथक घरी आल्याने आपल्या लीगल टीमने त्यांना बाहेरच रोखले आहे.

दिल्लीत ऑपरेशन लोटस सुरू असून भाजपकडून आमच्या आमदारांना 15 कोटींची ऑफर दिली गेल्याचा आरोप आपचे खासदार संजय सिंह यांनी केला होता. यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी अरविंद केजरीवास संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी एसीबीचे पथक पाठवले. त्यानुसार एक पथक केजरीवाल यांच्या घरीही धडकले. मात्र त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर नोटीस नसल्याचे आपल्या लीगल सेलचे हेड ज्येष्ठ वकील संजीव नसियार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

चार ते पाच लोक आले असून ते सतत कुणाशी तरी फोनवर बोलत आहेत. त्यांच्याकडे नोटीसही नाही. एसीबीकडे तक्रार देण्यासाठी संजय सिंह स्वत: गेले आहेत. पण या लोकांना हे माहिती नाही. अधिकृत कागदपत्र दाखवत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना आत घुसू देणार नाही आणि कोणतेही बेकायदेशीर काम करू देणार नाही. या राजकीय ड्रामामागे भाजपचे षडयंत्र आहे, असेही संजीव नसियार म्हणाले.

एसीबीच्या पथकाकडे कोणतेही कागदपत्र नाही. कोणत्या कायद्यांतर्गत तुम्ही आला आहात असे विचारतोय, पण त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांना वरतून फोन आला आणि ते केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. आकाच्या सांगण्यावरून ते इथे आले आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांचे वकील ऋषिकेश कुमार यांनी केला. हा देश कायद्याने चालतो. एसीबीच्या लोकांना बेकायदेशीर काम करू देणार नाही, असेही ते म्हणाले.