साताऱ्यात एका तरुणीने दाखवलेल्या धाडसामुळे चक्क न्यायाधीशच एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. जामीन मंजूर करण्यासाठी संशयित आरोपीकडून पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने जिल्हा सत्रन्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. आपल्यावर अन्याय झाला तर न्यायालयात दाद मिळेल अशी सर्वसामान्यांची धारणा असते, मात्र न्यायाधीशही लाच मागू लागले तर विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
न्यायाधीश धनंजय निकम, आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई) आणि अन्य एक व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका 24 वर्षीय तरुणीने पुणे ‘एसीबी’ कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार ही कारवाई झाली आहे. तक्रारदार तरुणीच्या वडिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांना अटकही करण्यात आली होती. तरुणीचे वडील सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी सातारा जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. हा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्याकडे प्रलंबित आहे. जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी आनंद खरात आणि किशोर खरात यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्यावरून पाच लाख रुपयांची लाच मागितली. तरुणीने पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. पुणे एसीबीच्या पथकाने 3 व 9 डिसेंबरला सातारा येथे जाऊन पंचासमक्ष पडताळणी केली. न्यायाधीश धनंजय निकम यांनी आनंद खरात आणि किशोर खरात यांच्याशी संगनमत करून त्यांच्यामार्फत पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे सातारा जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच असलेल्या एका हॉटेलमध्ये एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. न्यायाधीश निकम यांच्यासह चौघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपअधीक्षक अनिल कटके तपास करत आहेत.