Short news – विमानात ‘दम मारो दम’ प्रवाशाला पडले महागात

अबुधाबी ते मुंबई विमान प्रवासात प्रवाशाने ‘दम मारो दम’ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे खासगी विमान कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. बुधवारी पहाटे एक विमान अबुधाबी येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत होते. पहाटे तीनच्या सुमारास पंट्रोल रूममध्ये मेसेज आला. एक प्रवाशी हा विमानातील टॉयलेटमध्ये गेला होता. काही वेळाने तो पुन्हा परत आला. हा प्रकार केबिन क्रूच्या लक्षात आला. तिने त्या प्रवाशाकडे चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडून एक सिगारेटचे पाकीट जप्त केले. या प्रकरणी प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाण्याची टाकी फुटून मुलीचा मृत्यू; 3 जखमी

नागपाडामधील सिद्धार्थनगर येथील बीएमसी कॉलनीत बुधवारी इमारतीचे बांधकाम सुरू असताना सिमेंटची पाण्याची टाकी फुटून झालेल्या अपघातात 9 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी आलेले हे कामगार आणि त्यांचे कुटुंबीय असल्याचे समजते. घटनेत खुशी खातून (9) हिचा मृत्यू झाला तर मिरज खातून (9), गुलाम रसूल (32) व नाजीरा (33) हे तिघे जखमी झाले असून तिघांना फौजिया या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पोलिसावर हल्ला

वाहतुकीला अडथळा आणणाऱयाला बाजूला काढल्याने त्याने लाकडी दांडा पोलिसाच्या डोक्यात मारल्याची घटना घडली आहे. माणिक सावंत असे जखमी पोलिसाचे नाव आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. माणिक सावंत हे मालाड पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. नाताळनिमित्त मंगळवारी दुपारी ते सहकाऱयासोबत गस्त करत होते. ते काचपाडा सिग्नल लिंक रोड येथून रामचंद्र स्टेशन लेनच्या दिशेने जात होते. तेव्हा साईप्रसाद बार परिसरात वाहतूककाsंडी झाली होती. वाहतूककोंडी झाल्याचे दिसताच सावंत हे तेथे गेले. तेव्हा एक जण रस्त्यात हातवारे करून येणाऱया-जाणाऱया वाहनांना थांबवून अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होता.

जादा भाडे आकारणाऱया चालकावर कारवाई

विमानतळावर छोटय़ा अंतराच्या प्रवासासाठी जादा भाडे आकारणाऱया खासगी टॅक्सी चालकावर सहार पोलिसांनी कारवाई केली. राज गोस्वामी असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हे नागपूर येथे राहतात. 15 डिसेंबरला ते मलेशियन एअरलाईन्सने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. विमानतळाबाहेर दोन टॅक्सीचालक उभे होते. त्याने हॉटेलला सोडतो असे सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार हे त्या खासगी टॅक्सीत बसले. त्यानंतर ते टॅक्सीने विलेपार्ले येथील एका हॉटेलजवळ उतरले. त्या चालकाने तक्रारदाराकडून टॅक्सीचे भाडे 2800 रुपये घेतले.

सोने घेऊन कारागीर पसार

दागिने बनवण्यासाठी दिलेले सोने घेऊन कारागीराने पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहे. पळून गेलेल्या कारागीरांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. तक्रारदार याचा झव्हेरी बाजार येथे सोन्याचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे. त्या कारखान्यात दिलेल्या डिझाईननुसार सोन्याचे दागिने बनवले जातात. त्याच्याकडे 15 कारागीर हे दागिने बनवण्याचे काम करतात.

17 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई

राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि स्थानिक पोलिसांनी मुंबई, नवी मुंबई, नाशिक ठाणे येथे संयुक्तपणे कृती करून 17 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. त्यात 14 पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. राज्यात अवैधपणे राहणाऱया बांगलादेशी नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. अवैधपणे राहणाऱया बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे, मुंबई शहर, नवी मुंबई, नाशिक येथे संयुक्त कारवाई करून बांगलादेशी नागरिकांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी 10 गुन्हे दाखल केले असून 17 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. त्यात 14 पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. बांग्लादेशी नागरिकानी कागदपत्रांचा गैरवापर करून आधारकार्ड, पॅनकार्ड इतर ओळखपत्र बनवल्याचे तपासात समोर आले आहे.