सध्याच्या काळात परदेशवारी गरजेचीच बनली आहे. हे आता काल्पनिक राहिलेले नाही. परदेशात जाणे हे दिखाव्यासाठी राहिलेले नाही, हे अर्थपूर्ण आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
हे निरीक्षण नोंदवत न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वेत सेठना यांच्या खंडपीठाने एका अल्पवयीन मुलीला शिक्षणाकरिता परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट देण्याचे आदेश पासपोर्ट प्राधिकरणाला दिले.
या मुलीच्या कुटुंबात वाद सुरू आहेत. तिला पासपोर्ट देऊ नका, असे पत्र तिच्या वडिलांनी प्राधिकरणाला लिहिले होते. त्यामुळे तिला पासपोर्ट पुन्हा देण्यास प्राधिकरणाने नकार दिला होता. त्याविरोधात दाखल झालेली याचिका न्यायालयाने मंजूर केली.
परदेशवारी हे बदलाचे प्रतीक
नोकरी, शिक्षणासाठी परदेशात जाणे नित्याचे झाले आहे. हा प्रवासाचा मूलभूत अधिकार तर आहेच, पण अत्याधुनिक काळातील चांगल्या बदलाचे प्रतीक आहे. याला प्राधिकरणाने प्रोत्साहन द्यायला हवे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मुलीचे खच्चीकरण होईल
संबंधित मुलगी दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिला पुढील शिक्षणासाठी जपानला जायचे आहे. यासाठी पासपोर्ट नाकारला तर मुलीचे खच्चीकरण होईल. काwटुंबिक वादाचा फटका तिच्या शिक्षणाला बसायला नको, असेही न्यायालयाने नमूद केले.