काळाचौकी येथील अभ्यूदय नगर या म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा सी अँड डी एजन्सीमार्फत एकत्रित पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. रहिवाशांना कमीत कमी 635 स्क्वेअर फुटांची सदनिका देण्याच्या दृष्टीने टेंडर काढण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
मुंबईतील अभ्यूदय नगर म्हाडाची मोठी वसाहत आहे. या वसाहतीचा सी अँड डी च्या मार्फत पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुढील प्रक्रिया होत असताना अनेक बैठका म्हाडा स्तरावर झाल्या. त्यात 500 स्क्वे. फुटाच्यावर जाता येणार नाही अशी चर्चा झाल्याने अभ्यूदय नगरमधील रहिवाशी संभ्रमित होते. मागील विकासकाने जेवढी जागा देण्याचे मान्य केले होते त्या आधारे मोठी जागा देण्याची मागणी रहिवाशांची होती. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा होऊन किमान 635 स्क्वेअर फूट किंवा त्यापेक्षा जास्त जागा देण्याबाबत टेंडर काढावे असे निर्देश दिले गेले. प्रत्येकाला कार पाकि&ंग देण्याची मागणीही मान्य करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वलसा नायर, आमदार प्रवीण दरेकर, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते.