टीम इंडियाची सूत्र हाती घेताच गंभीर ॲक्शन मोडवर; फलंदाजी अन् गोलंदाजी कोचही बदलणार, कोणाची नावं चर्चेत?

राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपताच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची वर्णी लागली. 2027 पर्यंत तो या पदावर कार्यरत असणार आहे.

टीम इंडियाने 2007 आणि 2011 रोजी जिंकलेल्या वर्ल्डकप संघाचा तो भाग होता. दोन्ही वर्ल्डकपमध्ये फायनल लढतीत गंभीरने दमदार खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली होती. नुकतेच त्याच्या मेंटोरशिप खाली आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्पर्धेवर नाव कोरले. तेव्हापासून गंभीर टीम इंडियाचा कोच होणार अशी चर्चा होती आणि मंगळवारी बीसीसीआय सचिव जय शहा यांनी यावर शिक्कामोर्तब केले.

टीम इंडियाची सूत्र हाती घेतल्यानंतर लागलीच गंभीर ॲक्शन मोडवर आला आहे. राहुल द्रविडच्या सोबत फलंदाजी कोच विक्रम राठोड आणि गोलंदाजी कोच पारस म्हांब्रे यांचाही कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी अनुभवी लोकांची भर्ती केली जाणार असून गंभीरने यासाठी दोन नावेही सुचवल्याचे वृत्त आहे.

गोलंदाजी कोचसाठी गंभीरने विनय कुमार, तर फलंदाजी कोचसाठी अभिषेक नायर यांची शिफारस केल्याचे वृत्त आज तकने दिले आहे. विजय कुमार याने टीम इंडिया कडून 1 कसोटी, 38 वन डे आणि 9 टी20 सामने खेळले आहे. 2013 रोजी धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा तो भाग होता. तर अभिषेक नायर केकेआरचा असिस्टंट कोच आहे.

झहीरचे नावही चर्चेत

दरम्यान, गोलंदाजी कोचसाठी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी कोच पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे