
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या अमरेंद्र कुमार मिश्राला सोमवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. अमरेंद्रला 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले. दरम्यान, अमरेंद्रला मंजूर झालेल्या जामिनाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे तेजस्वी घोसाळकर यांचे वकील भूषण महाडिक यांनी सांगितले.
अमरेंद्र हा अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱया मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक होता. मॉरिसने ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडून अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली, ते पिस्तुल अमरेंद्रचे होते. या संबंधांवरून पोलिसांनी अमरेंद्रला अटक केली होती. अमरेंद्रने यापूर्वीही जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी त्याचा अर्ज फेटाळला गेला होता. त्यानंतर त्याने दुसऱयांदा जामीन अर्ज दाखल केला होता. त्याच्या अर्जावर सत्र न्यायाधीश व्ही. एम. पाथाडे यांनी सुनावणी केली आणि त्याला जामीन मंजूर केला. त्याच्या जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे अॅड. भूषण महाडिक यांनी सांगितले.