ठसा – महापाषाण संस्कृतीचा वारसा

>> अभिषेक भटपल्लीवार

चंद्रपूर जिह्यातील नागभीड येथील शिवटेकडीच्या पायथ्याशी असलेल्या शिलास्तंभांच्या अस्तित्वाला सध्या धोका निर्माण झाला आहे. येथील जवळपास चौदा शिलास्तंभ प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे अखेरची घटका मोजत आहेत. येथील शिलास्तंभ साधारणतः 2500 ते 3000 वर्षांपासून भूतकाळातील समृद्ध इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणून उभे आहेत. परिसरातील लग्नकार्यासाठीच्या सभागृहाच्या बांधकामाचे काम जोरात सुरू आहे. त्याच्या खोदकामातील माती या शिलास्तंभांच्या जागेवर अनधिकृतपणे टाकून ते शिलास्तंभ मातीखाली गाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. विशेष म्हणजे पुरातत्त्व विभागाच्या परवानगीशिवाय हे कटकारस्थान रचले जात आहे. राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या जिह्यातच सांस्कृतिक ठेव्याला जमीनदोस्त करण्याचा हा प्रकार सध्या चर्चेचा विषय होऊन बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील इतिहास थेट तीन हजार वर्षांपूर्वी आपल्याला घेऊन जातो. जिल्ह्यातील नागभीड तालुका महापाषाण संस्कृतीच्या विविध खाणाखुणा घेऊन उभा आहे. देशातीलच नव्हे, तर विदेशी अभ्यासकांनी येथे सापडणाऱया शीलास्तंभाचा अभ्यास केलेला आहे. पुरातत्त्व विभाग, जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा ऐतिहासिक ठेवा आता शेवटची घटका मोजू लागला आहे.
येथे ‘दिव्याखाली अंधार’
राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वाघनख आणण्याच्या त्यांचा निर्णयाचे स्वागत झाले. मात्र जिल्ह्यातील ऐतिहासिक वारशांकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे आता बोलले जात आहे. नागभीड येथील ऐतिहासिक स्थळ संरक्षित स्मारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.चंद्रपूर जिह्यातील अनेक ऐतिहासिक स्थळे शेवटची घटका मोजत आहेत. त्यामुळे सांस्कृतिक मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ‘दिव्याखाली अंधार’ असल्याची टीका इतिहासप्रेमींकडून होत आहे.
काय आहेत शिलास्तंभ….
प्रागैतिहासिक काळात, विशेषतः इ.स.पूर्व दुसऱया-पहिल्या सहस्रकांत मोठमोठ्या ओबडधोबड शिळांची रचना करून स्मारके उभी करण्याची पद्धत होती. स्मारकाच्या मध्यभागी दगडाची मोठी शिळा उभी केली जायची. त्याला शिलास्तंभ म्हटले जाते, तर त्या लोकांच्या संस्कृतीला महापाषाण किंवा बृहदाश्मयुगीन संस्कृती म्हटले जाते. भारतात ही संस्कृती साधारणतः इ.स.पूर्व 1000 ते इ.स.पूर्व 200 दरम्यानची, म्हणजे लोहयुगकालीन आहे.
विदर्भातील महापाषाण संस्कृती
अभ्यासाचा विषय…
विदर्भातील महापाषाण संस्कृती जगभर अभ्यासकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. येथील दफनाच्या प्रकारांत शिलावर्तुळांचे (Stone Circles) प्रमाण मुबलक आहे, तर शिलास्तंभांचे (Menhirs) प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे अशा ‘शिलास्तंभांची भूमी’ म्हणून नागभीड तालुक्याची एक वेगळीच ओळख आहे. राज्य पुरातत्त्व विभागाचे अधिकारी असलेल्या डॉ. र. रा. बोरकर यांनी नागभीडच्या शिवटेकडीच्या पायथ्यालगत 14 शिलास्तंभ 25 वर्षांपूर्वी शोधून काढले होते. मुंबई येथील इतिहास अभ्यासक अमित भगत यांनी मागील काही वर्षांत येथील ‘झेप निसर्गमित्र’ या पर्यावरणवादी संस्थेसोबत मिळून नागभीड तालुक्यातील शंभरहून अधिक शिलास्तंभ उजेडात आणले आहेत.
नागरिकांमध्ये रोष
ज्या संस्कृतीमुळे आपल्या शहराची जगभर ओळख झाली आहे ती संस्कृती आता नष्ट होत असल्याचे बघून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. प्रशासनाविरुद्ध कमालीचा रोष निर्माण झाला आहे. विदर्भाखेरीज उर्वरित महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील अभ्यासकांकडून सदर प्रकरणात शासनाकडून तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
संरक्षित स्मारक घोषित करावे
इतिहास अभ्यासक अमित भगत यांनी या स्थळाला निर्माण झालेला धोका अग्रक्रमाने हटवून त्वरित यास संरक्षित स्मारक घोषित करावे अशी मागणी केली आहे. नागभीडच्या शिलास्तंभांचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून व येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी नागभीडला शिलास्तंभांचा तालुका घोषित करावे अशी भगत यांनी मागणी केली आहे.