>> अभिराम भडकमकर
जसं जसं वर्ष संपत जातं, काहीतरी मागे पडत गेलं असं वाटत राहतं. गतवर्षीचे संकल्प आणि संपूर्ण वर्षभरात त्याला आलेले मूर्त रूप किंवा त्यातलं काहीच करता न आल्याची खंत! असं काहीसं विचित्र वाटत राहतं. संकल्प आणि सिद्धी यामध्ये केवळ प्रयत्नाचाच भाग असतो की अनेकदा नशिबाचासुद्धा? असेही विचार वर्ष संपता संपता मनात खेळू लागतात. वर्ष संपत आलं की नेहमीचे विनोद सोशल मीडियावर भराभर फिरू लागतात. पण त्यातलं काही वास्तव असतं.
जसं जसं वर्ष संपत जातं, तसं काहीतरी मागे पडत गेलं असं वाटत राहतं. गतवर्षीचे संकल्प आणि संपूर्ण वर्षभरात त्याला आलेले मूर्त रूप किंवा त्यातलं काहीच करता न आल्याची खंत असं काहीसं विचित्र वाटत राहतं. संकल्प आणि सिद्धी यामध्ये केवळ प्रयत्नाचाच भाग असतो की अनेकदा नशिबाचासुद्धा? असेही विचार वर्ष संपता संपता मनात खेळू लागतात.
माझा एक मित्र जो एक अत्याधुनिक व्यायामशाळा म्हणजे जिम चालवतो, तो मला नेहमी म्हणतो, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत आपल्या तब्येतीची प्रचंड काळजी करणारे आणि आता सुधारतोच तब्येत असं म्हणत जिमचे सदस्यत्व घेणारे व जानेवारीचे दहा-बारा दिवस येऊन पुन्हा दांडय़ा मारणारे तेच काय ते आमचे खरे ग्राहक! त्यामुळे मनापासून ज्यांना व्यायाम करायचा असतो अशी मंडळी जानेवारीचे पहिले दहा दिवस जिमला येणे टाळतात आणि त्यांना माहीत असतं की, नंतर वर्षभर मोकळं मैदान असणार आहे.
आमच्या क्षेत्रामध्ये खरं तर डिसेंबर हा काही शेवटचा महिना नसतो. आम्हाला बाराही महिने सारखे, पण नुकताच दिवंगत झालेला माझा एक मित्र म्हणजे ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक मंगेश कुलकर्णी मला नेहमी सांगायचा, डिसेंबर वगैरे काही नाही. त्या दिवशी आपलं आन्सरिंग मशीन ऑन करून ठेवायचं आणि आपण घराबाहेर राहायचं. फोन उचलायचा नाही. अर्थात हे तेव्हाचे आहे जेव्हा फक्त लँडलाईन होते, मोबाइल नव्हते आणि तो म्हणायचा की, रात्री खूप उशिरा घरी यायचं व सकाळी पहिलं काम करायचं ते म्हणजे आन्सरिंग मशीनवर आपल्याला किती जणांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ते मोजायचं. त्या शुभेच्छांची संख्या हा आपला त्यावर्षीचा कलात्मक शेअर बाजारातला भाव असतो. ती आपली पत असते. किती खरं आहे ते. या क्षेत्रातल्या अधिकतर नात्यांना व्यवहाराची जोड असते. हे सांगणारे त्याचे हे विधान मला खूप खरं वाटते. खरं तर डिसेंबर हा कॅलेंडरमधलं एक पान, एक महिना आणि आईन्स्टाईनने तर स्पष्टच म्हटलेलं होतं की भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असं काही नसतंच. हे माणसाने स्वतच्या सोयीसाठी पाडलेले तीन तुकडे आहेत. काळ हा स्थिर आहे. त्याला ना भूत, ना वर्तमान, ना भविष्य. पण तरीही डिसेंबरचे पान उलटताना खूप काही मागे पडलं असं वाटत राहतं. आजकाल 31 डिसेंबर साजरा करणं हे खूप प्रतिष्ठेचं झालं आहे. प्रचंड फटाके काय वाजतात. ट्रफिक जाम काय होतो. दारू तर पाण्यासारखी वाहते. पण 31 डिसेंबरला मोहन वाघ आपलं नवीन नाटक ओपन करायचे तो दिवस मराठी नाटकासाठी खूप महत्त्वाचा असायचा. मला आठवतं ज्या काळामध्ये कॉन्ट्रक्टचे प्रयोग मोठय़ा प्रमाणावर व्हायचे. त्यावेळेला 31 डिसेंबरची तारीख महत्त्वाची असायची.
दूरदर्शनवर 31 डिसेंबरचा कार्यक्रम पाहणं लोकांच्या इतक्या सवयीचं झालं होतं की, त्याशिवाय 31 डिसेंबर साजरा होत नसे आणि कलावंतांसाठी 31 डिसेंबरच्या कार्यक्रमांमध्ये असणं हे खूप प्रतिष्ठेचं व आनंदाचं मानलं जायचं. जवळ जवळ अख्खा महाराष्ट्रच दूरदर्शनला डोळे लावून बसलेला असायचा आणि मग दुसऱया दिवशी त्यावर प्रचंड चर्चा व्हायची, टीकाही व्हायची. मला आठवतं व. पु. काळे यांच्या एका कार्यक्रमानंतर लोकांनी खूप टीका केली होती. कारण त्याकाळी दूरदर्शनवर मदिरा आणि मदिरापान या दोन गोष्टी जवळ जवळ वर्ज्य होत्या. आज वपु असते आणि त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चाललेल्या गोष्टी पाहिल्या असत्या तर हे पाहून त्यांना हसू आलं असतं.
मला ऑस्ट्रेलियातील सिडनीमधला 31 डिसेंबर आठवतो. प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन आणि लोकांना रोषणाई करायची, फटाक्यांची हौस असते याचंही भान राखत तिथल्या प्रशासनाने आपणच हे सगळं साजरं करायचं असं ठरवलेलं असतं आणि 31 डिसेंबरच्या रात्री प्रशासन स्वत अतिशय सुरेख अशी आतषबाजी सादर करतं. ती पाहण्यासाठी नदीच्या काठी प्रचंड लोक जमा झालेले असतात. डिसेंबरचं कॅलेंडरमधलं पान जसं संपत येतं तसं तसं आपण एका वर्षांनी अधिक मोठे किंवा म्हातारे झालोय असं वाटू लागतं. काय गंमत असते म्हटलं तर काहीच नसतं आणि म्हटलं तर एक वर्ष संपलेलं असतं व आता नवीन वर्षात आपण प्रवेश करतो आहोत असं वाटत राहतं.
मोबाइल नसण्याच्या काळामध्ये आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब असायची ती म्हणजे डायऱया. लोकांना दैनंदिनी लिहिण्यापासून ते दैनंदिन कामे लिहून काढण्यापर्यंत अनेक कामांसाठी डायऱया लागायच्या आणि मग डायरी मिळवणं हा एक टास्क होऊन बसलेला असायचा. कुणी जर कॅलेंडर दिलं तर ती मोठी भेट वाटायची आणि त्यासोबत डायरी मिळाली तर वा! मग काय मस्तच! या डायऱयांमध्ये लोक कुणाकुणाच्या सह्या घ्यायचे. चांगली चांगली सुभाषितं, पुस्तकांमधली चांगली वाक्ये लिहून काढायचे. ही डायरी अगदी हृदयाशी जपलेली असायची. आज मोबाइलच्या जमान्यामध्ये डायरी मिळणं यात काय मजा होती हे कदाचित कळणार नाही. नंतर कॅलेंडरनेही कात टाकली. आपल्या पिढीला ते सगळं आठवत राहतं आणि मग कॅलेंडरचे पान उलटताना वाटायला लागतं, अरे खरंच की किती काळ मागे पडला.
बरंच काही मागे पडलेलं आपल्या आठवणींमध्ये साचलेलं असतं. 31 डिसेंबरच्या क्षणी एकटे एकाकी बसले असताना ते सगळे उचंबळून वर येतं. मनाचा तळ ढवळला जातो आणि वाटतं तो काळ अधिक चांगला होता की हा? पण मग वाटतं तेही चांगलं होतं. हेही छान आहे. फक्त दृष्टिकोन बदलत गेलं पाहिजे.
एक कॅलेंडर टाकून भिंतीवरच्या खिळ्याला दुसरे कॅलेंडर लागणं म्हणजे काळ सरकला असं नव्हे, तर आपण साचून न राहता काळाच्या बरोबर पुढे पुढे सरकत राहणं महत्त्वाचं. जणू कात टाकावी तसं. आपण कॅलेंडरचं पान मागे टाकतो आणि पुढे जातो. आईन्स्टाईन म्हणतो त्याप्रमाणे काळ आहे तसाच असतो. आपण आपल्या सोयीसाठी पाडलेल्या भूतकाळाच्या तुकडय़ातून वर्तमानकाळाच्या तुकडय़ातून भविष्यकाळामध्ये प्रवेश करत असतो. सर्वांना या प्रवेशासाठी म्हणजेच नववर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षात भेटत राहूच. नवीन नवीन काही जाणून घेत, काही एकमेकांशी वाटून घेत,
कारणं कितीही बदलली तरी माणसाला माणूस हवा असतो. हे काही बदलणार नाही.
(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)