अभिजित काळजी करू नका.. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ! मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

मुजोर अधिकारी अखिलेश शुक्ला याने गुंडांकरवी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिजित देशमुख यांची मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत अभिजित तुम्ही घाबरू नका, महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वासच मराठी एकीकरण समितीने अभिजित देशमुख यांना दिला. दरम्यान, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी ठाणे पोलीस आयुक्त व खडकपाडा पोलिसांची भेट घेत निवेदनही दिले.

धूप लावण्याच्या किरकोळ वादातून कल्याणमधील उच्चभ्रू अजमेरा हाईट्स इमारतीत सरकारी अधिकारी असलेल्या मुजोर अखिलेश शुक्ला याने दोन मराठी कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजले. 36 तासानंतर मुजोर शुक्लासह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मराठी एकीकरण समितीने आज रुग्णालयात जाऊन जखमी अभिजित देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

नुसते निलंबन नको.. कायमची हकालपट्टी करा

देशमुख कुटुंबीयांना मारहाण करणारा परप्रांतीय शुक्ला याच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने खडकपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. तसेच गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधातही कारवाईची मागणी केली. मुजोर शुक्ला याला नोकरीतून निलंबित करून चालणार नाही तर त्याची कायमस्वरूपी हकालपट्टी करावी असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.