एसआरएतील पात्र लाभार्थींसाठी अभय योजना, गृहनिर्माणमंत्र्यांची घोषणा

झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट-2 तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकाने विकली तर नव्याने झोपडी घेणाऱया मालकाचे नाव परिशिष्ट-2 मध्ये (पात्र लाभार्थी म्हणून) समाविष्ट करण्यासाठी ‘अभय योजना’ राबवण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत केली.

आमदार आशीष शेलार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. परिशिष्ट-2 मधील तरतुदींकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. मुंबईतील अनेक योजनांमध्ये मोठा तिढा निर्माण झाला आहे, अनेक योजना 20 ते 25 वर्षे रखडल्या. त्यामुळे काही जणांनी काwटुंबिक कारणास्तव घरे विकली, पण ती नावावर होत नाहीत. त्यामुळे योजनामध्ये तिढा निर्माण होतो व योजना रखडतात, असे आशीष शेलार यांनी सरकारच्या निदर्शनास आणले. त्यावर यासाठी एक विशेष सवलत योजना जाहीर करण्याची तयारी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी दर्शवली असून अधिवेशनाच्या काळात याबाबत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी परिशिष्ट-2 जाहीर झाल्यानंतर एखाद्या झोपडीधारकाचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रकरणात येत असलेल्या अडचणींमुळे हे प्रकल्प रेंगाळत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.