यशस्विनी – जिद्द आणि चिकाटी

>> अभय मिरजकर

प्रभा प्रेमनाथ कुमठेकर यांनी बचतगटाच्या माध्यमातून व कुटुंबियांच्या मदतीने आपला व्यवसाय उभा केला.  जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर विजया फूड्स हा ब्रँड परदेशात पोहोचवून एक यशस्वी उद्योजक ठरल्या आहेत.

लातूर येथील प्रभा कुमठेकर यांच्या विजया फूड्स हा लाडूंचा ब्रँड राज्यासोबतच परदेशातही पोहोचला आहे. लातूर तालुक्यातील मौजे चिंचोली बल्लाळनाथ या छोटय़ाशा गावातील प्रभा प्रेमनाथ कुमठेकर या आज छोट्या उद्योगामधून एक यशस्वी उद्योजक म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत. त्यासाठी त्यांना साथ लाभली ती कुटुंबीय आणि उमेदची टीम यांची.

युवक, युवतींनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसाय उभा करून स्वावलंबी व्हावे यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत. परंतु लाभार्थी मात्र केवळ अनुदानावर डोळा ठेवून असतात. ते मिळाले की उद्योग, धंदा बंद होतो. `एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हा सहकाराचा मूलमंत्र. पण तोसुद्धा अंमलात आणला केवळ मोजक्या व्यक्तींनी, संस्थांनी. बचत गट चळवळ सुरू झाली आणि यामधून काही उद्योजक उभेही राहिले. पण सातत्य नव्हते. आज बचतगट उत्पादने म्हटली की डोळ्यासमोर येतात पापड, लोणची, चटण्या, कुरडई, बाजरीच्या खारोडय़ा, विणकामाच्या काही वस्तू, हळद, मिरची, मसाला, चिवडा. त्यातूनही काहीतरी वेगळे करून आपला ब्रँड निर्माण करण्याची काही उदाहरणे बोटावर मोजता येतील एवढीच राज्यात असावी. लातूर तालुक्यातील मौजे चिंचोली बल्लाळनाथ येथील प्रभा प्रेमनाथ कुमठेकर यांनी बचतगटाच्या माध्यमातून आपला व्यवसाय उभा करण्याचा निर्धार केला. कुटुंबीयांनी त्यांना साथ दिली आणि गूळ-शेंगदाणे लाडू त्या तयार करू लागल्या. श्री विघ्नहर्ता स्वयंसहाय्यता समूह याच्या माध्यमातून त्यांनी विजया फूड्स या नावाने आपला गूळ-शेंगदाणा लाडूचा ब्रँड तयार केला.

बाजारातील लाडूमध्ये गुळाचे प्रमाण अधिक असते. शेंगदाणे वापरण्याऐवजी पेंडीचा वापर केला जातो. त्यामुळे हे लाडू कोणी सातत्याने घेत नाही. म्हणून त्यांनी शेंगदाणे आणि सेंद्रिय गुळाचे लाडू बनवले. 2016 मध्ये गावात हा व्यवसाय सुरू झाला, पण प्रतिसाद कमी मिळत असे. हाताने बनवायलाही भरपूर वेळ लागत असे. लातूरच्या उमेद टीमने त्यांचे मनोबल वाढवले, उत्पादन पी करण्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मदत केली.

उत्पादन चांगले होते, पण पीचे तंत्र नव्हते. ते उमेदमुळे मिळाले. शेंगदाणा लाडूसोबत ड्रायफ्रूट लाडू बनवले आणि व्यवसाय वाढीस लागला. या लाडूंची मागणी वाढू लागली. बँकेने त्यांना सहकार्य केले आणि एक लाख पन्नास हजार रुपये कर्ज मंजूर केले. यातून त्यांनी लाडू बनवण्याची मशीन 2024 मध्ये गुजरातमधील राजकोट येथून आणली आणि उत्पादनात वाढ झाली. जवळपास बँकेचे अर्धे कर्जही त्यांनी फेडले आहे. वर्षांची उलाढाल ही 12 ते 15 लाखापर्यंत होत आहे. सर्व खर्च वजा करून किमान 20 टक्के नफा राहतो. पूर्वी दहा किलोचे उत्पादन करण्यासाठी एक दिवस लागायचा. मशीनमुळे ते काम आता एका तासात केले जाते. पूर्वी शेंगदाणे बाजारातून घरी आणायचे, त्याला भाजायचे. नंतर लाडूसाठी वापरायचे. पण आता भाजलेले तयार शेंगदाणे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अतिरिक्त कामाच्या वेळेची बचत होते.

यशासाठी घेतलेले कष्ट, जिद्द आणि चिकाटी यामुळे यश मिळतेच हे प्रभा कुमठेकर यांच्या उद्योगाच्या प्रगतीवरून लक्षात येते. चिंचोली बल्लाळनाथ गावातही या लाडूंची मागणी वाढली आहे. तसेच जिह्याचे ठिकाणी लातूर शहरात पण मागणी वाढली आहे. मोठय़ा

ऑर्डरही आता त्यांना मिळत आहेत. सोबतच त्या मुखवासही तयार करत आहेत. त्याला मागणी चांगली आहे. त्यामुळे मुखवासचे उत्पादन सुरू केले आहे. लवकरच मेथी लाडू, डिंक लाडू, राजगिरा लाडू, शुगर फ्री ड्रायफ्रुट लाडू असे लाडूचे वेगवेगळे ब्रॅण्ड तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती ही प्रभा आणि त्यांचे पती प्रेमनाथ कुमठेकर यांनी दिली.

बचतगट उत्पादित उत्पादनाच्या पीसाठी ठिकठिकाणी स्टॉल लावले जातात. लातूर, बीड, नांदेड, बार्शी, ठाणे, नवी मुंबई, मुंबई अशा ठिकाणी स्टॉल लावून त्यांच्या उत्पादित मालाची पी होत आहे. आज केवळ राज्यातच नव्हे तर अमेरिकेतही लाडू पोहोचले आहेत, असेही त्यांनी सांगितले.