![Untitled design (8)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/Untitled-design-8-696x447.jpg)
गेल्या 18 वर्षांपासून सौदी अरबमधील तुरुंगात खितपत पडलेला हिंदुस्थानी नागरिक अब्दुल रहीमची लवकरच सुटका होणार आहे. सुटका झाल्यानंतर तो हिंदुस्थानात परतणार आहे. 2006 साली एका अपंग मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कोर्टाने अब्दुलला फाशीची शिक्षा ठोठावली होती. परंतु आता मुलाच्या कुटुंबीयांनी अब्दुलची माफी स्वीकारली आहे. त्यामुळे अब्दुलच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. 44 वर्षीय अब्दुल रहीम केरळमधील कोझिकोडचा रहिवासी आहे. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सौदीतील हिंदुस्थानी दूतावासाचे अधिकारी युसूफ काकनचेरीही कोर्टात उपस्थित होते. अब्दुलच्या सुटकेसाठी समिती स्थापन करण्यात आली होती.
हिंदू-मुस्लिम एकत्र
अब्दुलला वाचवण्यासाठी 34 कोटी रुपयांची गरज होती. परंतु, अब्दुलचे कुटुंब गरीब आहे. इतके पैसे जमा करणे अशक्य होते. परंतु, अब्दुलसाठी हिंदू-मुस्लिम या दोन्ही समाजातील लोकांनी एकजूट दाखवत तब्बल 34 कोटी रुपयांची क्राउडफंडिंग जमा केली.