निष्क्रियता लपवण्यासाठी महायुतीकडून‘आपले सरकार’ पोर्टल बंद

‘आपले सरकार’ हे पोर्टल देखभाल आणि तांत्रिक कामासाठी 10 ते 14 एप्रिल या कालावधीत बंद राहणार असल्याची सूचना महायुती सरकारकडून राज्यातील सर्व ग्रामपंचायती आणि सेतू कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे, मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. हे पोर्टल गेल्या अनेक दिवसांपासून बंदच आहे. त्यामुळे हजारो लोकांची कामे अडून राहिली आहेत. ती निष्क्रियता लपवण्यासाठीच हे पोर्टल पाच दिवस बंद ठेवल्याचे बोलले जात आहे.

‘आपले सरकार’ पोर्टल 10 ते 14 एप्रिल या कालावधीत बंद राहणार असल्याची सूचना सरकारकडून आज आयत्या वेळी देण्यात आली. त्यापूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मुळात पोर्टल बंद ठेवण्यात येत असल्याची सरकारकडून देण्यात आलेली सूचना म्हणजे निवळ सोपस्कार ठरला आहे.

राज्य शासनाच्या सर्व शासकीय विभागांशी ‘ऑनलाइन’ पत्रव्यवहार करण्यासाठी महायुती सरकारने ‘आपले सरकार’ या पोर्टलची निर्मिती केली. राज्यातील अनेक नागरिकांना याचा लाभ झाला आहे, मात्र हे पोर्टल बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डागडुजीनंतर तरी ते योग्य प्रकारे चालेल का, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

उत्तरे नाहीच… फक्त टाळाटाळ

आपले सरकार या पोर्टलवर नागरिकांनी तक्रार केली तर त्यांना ठोस उत्तर मिळण्याऐवजी टाळाटाळच अधिकवेळा केली जाते. संबंधित विभागाला तुमची तक्रार पाठवण्यात आली आहे असे उत्तर तक्रारदाराला मिळते, पण त्या संबंधित विभागाने तक्रारीवर काय कारवाई केली त्याची माहिती मात्र मिळतच नाही असा अनेकांचा अनुभव आहे.