>>शुभांगी बिंदू-रानडे
भारतीय जनमानसाच्या जीवनात फार पूर्वीपासूनच आपल्या सण-उत्सवांना वैशिष्टय़पूर्ण स्थान आहे. सण-उत्सवांद्वारे आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन केले जाते. भारतातील विविध प्रकारच्या संस्कृतीची आपल्या मुलांना ओळख व्हावी, त्यांच्यावर योग्य ते संस्कार व्हावेत, त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. सण, संस्कृती आणि उत्सवांचे महत्त्व सांगणारे एकनाथ आव्हाड यांचे सुरेख पुस्तक ‘आपले सण आपली संस्कृती.’ या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची प्रस्तावना तर तारा भवाळकर यांची प्रतिक्रिया लाभली हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
या छोटेखानी पुस्तकातून आव्हाड यांनी काही भारतीय सण तसेच भारतातील काही आदरणीय व्यक्ती यांच्याबद्दलची माहिती अतिशय रंजकपणे सांगितली आहे. एका आनंदी मराठी चौकोनी कुटुंबाच्या रंगतदार गप्पा, अशा स्वरूपातून त्यांनी जी माहिती दिली आहे, त्यातून मुलांना अनेक विषयाची माहिती मिळत जाते. सण आणि संस्कृती, याबद्दलच त्यांनी मुख्यत्वे लिहिले असले, तरी त्याव्यतिरिक्तही अनेक विषयांतले महत्त्वाचे, कळीचे मुद्देही मुलांना समजतील, अशा प्रकारचे संवाद यात आहेत. उदा. ‘शतायुषी हो’ या म. गांधी यांच्याबद्दलच्या कथेतले, “बाळा, जीवनात जो छोटय़ा छोटय़ा गोष्टींचं महत्त्व जाणतो, तोच पुढे मोठा होतो,’’ हे वाक्य महत्त्वाची शिकवण देते. ‘स्नेह वाटूया जनात’ या कथेतून संक्रांतीसोबतच आहारशास्त्र, पर्यावरणविषयीची जागृती, आरोग्य याबद्दलही मुलांना काही छान माहिती मिळते. ‘रंगांतूनही हास्य उमलते’ या कथेतून, आपल्या मूळच्या सण साजरे करण्याच्या पद्धतीत झालेले बदल, त्यातून पर्यावरणाला आणि आपल्यालाही होणारे नुकसान आणि पारंपरिक पद्धतीनेच सण साजरे करणे कसे योग्य ठरेल, याची शिकवण इतक्या गोष्टी अगदी खुसखुशीत संवादांमधून मुलांना कळतात. याच कथेत भारताच्या विविधतेतील एकताही फार सुरेखपणे चित्रित झाली आहे. ‘चैतन्याचे कारंजे’ या कथेतून गणेशोत्सवाची माहिती देण्यासोबतच, मुलांनी निराधार मुलांसाठी वह्या-पेन देण्याचा उपक्रम ठरवणं, यातून लेखक मुलांना सामाजिक कर्तव्याची हलकीशी जाणीवही करून देतो. ‘ज्ञानरूपी वसा’ या कथेतील शिकवण तर फार फार उपयुक्त आहे बाकीच्याही सगळ्याच कथा अतिशय माहितीपूर्ण, रंजक आणि चांगली शिकवण देणाऱया आहेत.
प्रस्तुत पुस्तकात लेखकाने आपल्या भारतीय परंपरेतील संस्कृतीच्या माध्यमातून मुलांवर देशभक्ती व राष्ट्रभावनेचे संस्कार होतील अशा गोष्टींचा समावेश केला आहे. भारतीय सण, उत्सव आणि त्यातून बालमनावर होणारे संस्कार यामुळे या गोष्टी अनमोल ठरतात. मुलांना नकळतपणे मिळणाऱया जीवनोपयोगी संदेशामुळे मुलांचे भवितव्य समृद्ध होईल. या गोष्टींद्वारे लेखकाने मुलांच्या मनात आपल्या देशाविषयी प्रेम आणि आदर रुजवण्याचे काम केले आहे. इतकेच नव्हे तर यातून बालवाचकांना महापुरुषांच्या उच्च विचारांचे दर्शनही घडते.
उत्कृष्ट मुखपृष्ठ आणि गोष्टीला अनुरूप अशा चित्रांनी सजलेल्या या पुस्तकाची मांडणी सहज, सोपी असल्याने बाल वाचकांना हे पुस्तक नक्की आवडेल. मुलांना जर एखादी महागडी वस्तू देण्यापेक्षा एखादे चांगले पुस्तक दिले तर त्यातून त्यांना अभ्यासाचे महत्त्व तर कळतेच, शिवाय अशी पुस्तके त्यांना आनंद आणि ज्ञान बहाल करतात. हल्लीच्या मोबाइलच्या जमान्यात मुलांना खऱया ज्ञानाकडे, आपल्या संस्कृतीकडे वळवण्यासाठी आणि मुलांमध्ये आपल्या देशाबद्दलचा अभिमान पेरण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही.
आपले सण आपली संस्कृती
लेखक ः एकनाथ आव्हाड प्रकाशन ः साकेत प्रकाशन
पृष्ठ संख्या ः 80 किंमत ः 250 रु.