
आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेच्या अधिवेशनात नुकत्याच झालेल्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) पेपर लीक घोटाळ्यावर केंद्र सरकारविरोधा जोरदार हल्ला चढवला. राघव चढ्ढा म्हणाले की देशात दोन ‘IPL’ आहेत. एक म्हणजे Indian Premier League आणि दुसरे म्हणजे ‘Indian Paper Leak’. दुसऱ्या म्हणजेच ‘Indian Paper Leak’ मधून लाखो तरुण इच्छुकांचे भविष्य धोक्यात आलं आहे.
मंगळवारी राज्यसभेत बोलताना राघव चढ्ढा आक्रमक दिसले. गेल्या दशकात देशाची शिक्षण व्यवस्था सुरक्षित करण्यात केंद्र सरकारच्या अपयशाचा त्यांनी निषेध केला. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले की सध्या NEET-UGC परीक्षेत बसलेल्या 35 लाख उमेदवारांचं भवितव्य टांगलणीला आहे.
‘ती 35 लाख मुले आज संसदेकडे या आशेने पाहत आहेत की कदाचित त्यांच्या हक्कांचा विचार केला जाईल. देशातील अंदाजे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. आपण जगातील सर्वात तरुण देश आहोत, जिथे सरासरी वय 29 वर्षे आहे. विकसित राष्ट्रे ‘वृद्ध’ होत आहेत, तर आपण तरुण होत आहोत’, असे चढ्ढा यांनी सांगिले. देशात जगातील सर्वाधिक विद्यार्थी आहेत, ज्यांची संख्या जवळपास 31 कोटी असल्याचेही ते म्हणाले.
पुढे बोलताना, ‘या देशात दोन आयपीएल आहेत. एका आयपीएलमध्ये चेंडू आणि बॅटने खेळला जातो आणि दुसरीकडे तुम्ही तरुण विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळता, हा ‘Indian Paper Leak’ आहे’, अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
यासोबतच त्यांनी देशातील बेरोजगारीचा मुद्दा देखील उपस्थित केला. ‘आपण आपल्या देशातील तरुणांसाठी चांगली शिक्षण व्यवस्था देऊ शकत नाही आणि रोजगारही देऊ शकत नाही. संघटित क्षेत्रातील बेरोजगारी शिगेला पोहोचली असून त्याबद्दलचा डेटा आपल्याकडे उपलब्ध नाही’, असेही ते म्हणाले. राघव चढ्ढा यांनी केंद्राविरोधात अत्यंत मुद्देसूद आणि आक्रमक शैलित आपला मुद्दा मांडत मोदींच्या नेतृत्त्वातील सरकारला घेरले.