‘आप’चे सर्वेसर्वा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याच्या सीबीआयच्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कथित मद्य धोरण घोटाळ्यात केजरीवाल यांना केलेली अटक म्हणजे न्यायव्यवस्थेची थट्टा आहे, अशी जोरदार टीका ‘आप’ने केली आहे. मोदी सरकारच्या सांगण्यावरूनच सीबीआयने अटकेची कारवाई केली, अशी प्रतिक्रिया ‘आप’चे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी दिली आहे.
कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात 26 जून रोजी केजरीवाल यांना अटक केल्यानंतर सीबीआयच्या कोठडीत पाठवले होते. या कारवाईवर संजय सिंह यांनी टीका केली आहे. सीबीआय आणि ईडीने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. सीबीआयने देशातील न्यायव्यवस्थेची, कायदा-सुव्यवस्थेची तसेच राज्यघटनेची थट्टा केली आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सिंह यांनी दिली.
मनीष सिसोदिया प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा एकामागून एक गुन्हे दाखल करीत आहेत. ईडी आणि सीबीआयकडे गैरव्यवहाराचे कुठलेही पुरावे नाहीत. असे असताना केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करीत आहेत. या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणांवर अवमान कारवाई करावी, अशी मागणी संजय सिंह यांनी केली आहे.