दिल्लीत भाजपवाले बनवतायत बोगस मतदार! आजी-माजी खासदारांचा सहभाग, आपचे खासदार संजय सिंह यांचा आरोप

दिल्लीतील मतदार यादीच्या वादासंदर्भात सत्ताधारी आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला. खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणला. माजी खासदार प्रवेश सिंह वर्मा, पंकज चौधरी, कमलेश पासवान अशी काही लोक त्यांच्या क्षेत्रात बोगस मतदार बनवत आहेत. भाजपच्या आजी-माजी खासदारांच्या निवासस्थानांहून मतांसाठी अर्ज करण्यात आले. प्रवेश वर्मा हे खासदार नसून त्यांनी खासदाराच्या बंगल्यावर कब्जा केला, असे सांगताना संजय सिंह यांनी आकडेवारी सादर करत भाजपच्या बडय़ा नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

प्रवेश सिंह वर्मा, केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांच्यासह 40 जणांनी बोगस मतदार बनवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाहून अर्ज केला आहे. त्यामुळे मी पंतप्रधान मोदी यांना विचारू इच्छितो की, तुम्ही भाजपला देशातील सर्वात मोठा पक्ष मानता मग अशा पद्धतीने निवडणुका जिंकाल का? असा प्रश्न संजय सिंह यांनी विचारला. तसेच भाजपच्या या फसवणुकीबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली होती. त्यातील काहींवर कारवाई झाली. प्रवेश सिंह वर्मा गेल्या आठ महिन्यांपासून खासदाराच्या बंगल्यात राहत आहेत आणि त्यांनी तेथून मतदानासाठी अर्ज केला, मात्र त्या घरात राहण्याचा त्यांना अधिकार नाही, अशा शब्दांत सिंह यांनी भाजपला खडे बोल सुनावले.