दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने दिल्लीला 90च्या दशकातील स्थितीत आणले असून संपूर्ण कायदा-सुव्यवस्था उद्ध्वस्त केली, असा हल्लाबोल सिसोदिया यांनी केला आहे.
सिसोदिया म्हणाले की, दिल्लीच्या विविध भागात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. दिल्लीत राजरोसपणे व्यापाऱ्यांना वसुलीच्या धमक्या दिल्या जात आहेत. भाजपने दिल्लीला 90 च्या दशकात पोहोचवले आहे, ज्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्डचे राज्य होते. एएनआयशी बोलताना पुढे ते म्हणाले की, कोणी व्यापारी किंवा सामान्य व्यक्तीला दिल्लीत सुरक्षित वाटत नाही. ज्या व्यापाऱ्याचा व्यापार चांगला होतो त्यांना गॅंगस्टरच्या फोनची भिती आहे. त्यामुळे भाजप गॅंगस्टरना का प्रोत्साहन देत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला. दिल्ली पोलिसांचा वेगळा रुतबा होता. मात्र भाजपने तोही घालवल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला.
भाजपने कायदा-सुव्यवस्थेला उद्ध्वस्त केले आहे. दिल्लीत कायम गोळीबाराच्या घटना समोर येत असतात. रोज वसुलीच्या बातम्या समोर येत आहेत. हे काय सुरू आहे. संविधानातंर्गत कायदा-सुव्यवस्था राखणे भाजपची जबाबदारी आहे. जर ते दिल्लीत कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत आहे, तर त्यांनी ते काम आप सरकारकडे सोपवावे. आम्ही 10 दिवसांत कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात आणू, असा विश्वासच यावेळी त्यांनी व्यक्त केला.