Punjab News- लुधियानामध्ये ‘आप’च्या नेत्याची गोळी झाडून हत्या; पोलिसांचा तपास सुरू

पंजाबमधील लुधियाना येथे खन्नामध्ये सोमवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथे आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते तरलोचन सिंह यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरलोचन यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रयत्न सुरू असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरलोचन सिंग (60) हे इकोलाहा गावातील रहिवासी होते. तरलोचन यांनी सरपंचाची निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. यानंतर पक्षाने त्यांना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बनवले होते. सध्या तरलोचन सिंग हे गावातून सरपंचपदाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र सोमवारी सायंकाळी त्यांची हत्या करण्यात आली. तरलोचन हे त्यांच्या शेतातून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. यावेळी तरलोचन सिंग यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान पोलिसांकडून सध्या या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. कोणत्या तरी वैमानस्यातून वडिलांची हत्या करण्यात अल्याचे मृत तरलोचन सिंह यांचा मुलगा हरप्रीत सिंग यांनी सांगितले.