दिल्ली महापौरपदाच्या निवडणुकीत ‘आप’चा दणदणीत विजय, महेश खिंची यांनी भाजपच्या किशन लाल यांचा केला पराभव

दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज मतदान झाले. निवडणुकीत भाजप आणि आप यांच्यात चुरशीची लढत होती. महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार महेश खिंची विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार किशन लाल यांचा 3 मतांनी पराभव केला आहे.

या दोन्ही पदांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 284 मतदान होणार होते. यामध्ये 249 नगरसेवक, 14 आमदार, 7 लोकसभा खासदार आणि 3 राज्यसभा खासदार मतदान करणार होते. मात्र एकूण 263 मतदान झाले. यामध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला 133 तर भाजपच्या उमेदवाराला 130 मते मिळाली.

भाजपने शकूरपूर वॉर्डातून 47 वर्षीय किशन लाल आणि सादतपूर वॉर्डातून 41 वर्षीय नीता बिश्त यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली होती. ‘आप’ने करोलबागच्या देव नगर वॉर्डातून 45 वर्षीय महेश कुमार खिंची यांना महापौरपदासाठी आणि अमन विहारमधून रवींदर भारद्वाज यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली होती.

दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी भाजपचे नगरसेवक आणि पूर्व दिल्लीचे महापौर सत्य शर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शर्मा यांनी यादी डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीचे अध्यक्षपद भूषवले आहे. मात्र, दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपला निषेध व्यक्त केला होता. दलित नगराध्यक्षपदासाठी प्रस्तावित केलेल्या अल्प कार्यकाळावर नाराज होऊन काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती.