मतदान यादीतून ‘आप’ समर्थकांची नावे हटवण्याचा भाजपचा प्रयत्न, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघावर निशाणा साधला आहे. भाजप मतदान यादीतून आप समर्थकांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात व्यस्त आहे, असा खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तर आरएसएसचे लोक फक्त गालिचे पसरवतात असे केजरीवाल पुढे म्हणाले. विधानसभेत अधिवेशनीय भाषणावेळी ते बोलत होते.

येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे, याची जाणीव त्यांना झाली आहे. भाजपने आप मतदारांची ओळख पटवण्यासाठी आणि मतदार यादीतून त्यांची नावे काढून टाकण्यासाठी शहरातील भागात पगारी कर्मचारी तैनात केले आहेत. आम आदमी पक्षाची मते काढून टाकण्यासाठी आणि निवडणुकीत बोगस मतदान करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

प्रत्येक कॉलनीत, काही पैसे देऊन, त्यांनी कर्मचारी तैनात केले आहेत जे घरोघरी जाऊन लोकांना विचारत आहेत की तुम्ही कोणाला मत द्याल, जर कोणी म्हणत असेल की त्यांनी आम आदमी पार्टीला मतदान केले आहे, तर त्यांचे मत काढून टाकले जाते, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. मी दिल्लीतील जनतेला सांगू इच्छितो की, जर कोणी येऊन तुम्हाला विचारले की तुम्ही कोणत्या पक्षाला मत द्या, तर सांगा की मी भाजपला मत देतो. मग तुम्ही सुरक्षित आहात आणि तुमचे नाव मतदार यादीतून काढले जाणार नाही, असे आवाहनही केजरीवाल यांनी जनतेला केले आहे.

पुढे केजरीवाल यांनी संघावरही पुन्हा निशाणा साधला. केजरीवाल म्हणाले की, मला आरएसएसच्या लोकांची कीव येते, त्यांनी संपूर्ण आयुष्य आरएसएसला दिले आहे, पण त्यांना तिकीट मिळत नाही. आता आरएसएसचे लोक फक्त गालिचे पसरवतात, कधी भाजपसाठी, कधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांसाठी, कधी कोणा नेत्यासाठी, कधी कोणत्या नेत्यासाठी. मार्च 2016 ते मार्च 2024 पर्यंत पंतप्रधान मोदींनी 13 राज्य सरकारे 15 वेळा पाडण्याचा प्रयत्न केला आणि 10 सरकारे पाडण्यात यश मिळवले. ही सरकारची चोरी आहे, असेही केजरीवाल यांनी पुढे नमूद केले.