Aamir Khan- आमिर खानने संतोष देशमुखांच्या मुलाला मारली मिठी; पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात धनंजय देशमुखांशी साधला संवाद!

बीडमधील मस्साजोगमधील संतोष देशमुख यांच्या हत्येने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. ३ मार्चला संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो माध्यमांसमोर आल्यावर, अवघा महाराष्ट्र पेटून उठला होता. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील अनेक राजकारणी त्यांच्या घरी गेले होते. परंतु आता ‘पाणी फाऊंडेशन’च्या निमित्ताने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने देखील संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या कार्यक्रमाला आमिरची दुसरी पत्नी किरण राव देखील उपस्थित होती.

 

 

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांनी ९ डिसेंबर २०२४ ला अमानुषपणे मारहाण करुन त्यांचा निघृणपणे खून करण्यात आला होता. बीडमधील या प्रसंगाने अवघा महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्रातील या घटनेचे पडसाद समाजातील सर्व स्तरात उमटले होते. यावेळी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यात आला होता. राजीनाम्याची मागणी तीव्र झाल्यानंतर, धनंजय मुंडेना राजीनामा द्यावा लागला होता.

 

आमिर खान पाणी फाऊंडेशन कार्यक्रमाच्या निमित्ताने, धनंजय देशमुख यांची भेट झाली होती. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. माध्यमांसमोर या भेटीचा व्हिडीओ समोर आला असून, सदर भेटीमध्ये आमिरने धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला आणि कुटुंबीयांची विचारपूस सुद्धा केली. तसेच त्यांच्यासोबत आमिरने घडलेल्या प्रसंगासंदर्भात विचारपूसही केली. आमिर खानने संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची घेतलेल्या भेटीने उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आलं. आमिर खान यांनी संतोष देशमुखांच्या मुलाला विराजला जवळ करत त्याला मायेने मिठीसुद्धा मारली.

पवनचक्कीच्या वादातून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचे बंधू धनंजय देशमुख यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सुद्धा हेच कारण दोषारोपात नमूद केलेले आहे.