दिल्लीतही लाडकी बहीण

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच आम आदमी पार्टीने दिल्लीतील महिलांसाठी एका मोठय़ा निर्णयाची घोषणा केली आहे. दिल्लीतील आतिशी सरकारने महिलांना दर महिना 1 हजार रुपये देण्याची घोषणा केली असून ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या घोषणेनंतर या योजनेला दिल्लीच्या पॅबिनेटमध्ये गुरुवारी मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ऐन विधानसभा निवडणुकीआधी ‘लाडकी बहीण’ योजना आणली होती. त्याच धर्तीवर आता दिल्ली सरकारने ही योजना आणली आहे.

दिल्ली कॅबिनेटमध्ये योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री आतिशी आणि पक्षाच्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांना संबोधित केले. दिल्लीतील महिलांना दर महिना 1 हजार रुपये देण्यात येणार आहेत. येत्या 10 ते 15 दिवसांत दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होऊ शकणार नाहीत. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे महिलांना जे 1 हजार रुपये देण्यात येतील ते  पुरेसे ठरणार नाहीत. त्यामुळे दिल्लीत आम आदमी पार्टीचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या महिलांना 1 हजार रुपयांऐवजी 2100 रुपये प्रतिमहिना देण्यात येतील, असेही अरविंद केजरीवाल या वेळी म्हणाले. मुख्यमंत्री महिला सन्मान योजने अंतर्गत दिल्लीतील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ सरसकट मिळेल. या योजनेसाठी दिल्ली सरकारने आर्थिक वर्षात 2 हजार कोटी रुपयांचे बजेट तयार केले आहे, असेही केजरीवाल या वेळी म्हणाले.