वेल्फेअर सेंटर आणि आपला दवाखाना लवकरच सुरू, आदित्य ठाकरे यांची पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक

वरळीतील प्रलंबित नागरी कामांना गती मिळावी यासाठी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका जी-दक्षिण विभाग कार्यालयात पालिका अधिकाऱ्यांबरोबर आयोजित पेलेल्या बैठकीत अनेक कामे मार्गी लागली. बैठकीत पालिका अधिकाऱ्यांनी वेल्फेअर सेंटर, आपला दवाखाना हे लवकरच सुरू करू, त्याचबरोबर वरळी हिंदू स्मशानभूमीतील नूतनीकरणात बदल करण्यात येणार आहेत तर लोअर परळ पुलावर बनवण्यात येणारा फुटपाथ येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यामुळे वरळीकरांची गैरसोय दूर होणार असून रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वरळीतील प्रलंबित असलेल्या अनेक नागरी कामांना गती देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी जी-दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी शाखा क्रमांक 193 मधील वेल्फेअर सेंटर आणि आपला दवाखाना तोडल्यानंतर त्या जागेवर पुन्हा इमारत बांधली गेलेली नाही. याबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान, हे दोन्ही प्रकल्प लवकरच सुरू करून रहिवाशांची गैरसोय दूर करू, असे आश्वासन पालिकेकडून देण्यात आले. बैठकीला उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर, संजय कदम उपस्थित होते.

लोअर परळ पुलावरील फुटपाथ सुरू करणार 

जुना लोअर परळ पुलावर बस स्टॉप तसेच फुटपाथही होते. मात्र, नव्याने बांधलेल्या पुलावर या दोन्ही बाबी नसल्यामुळे वरळी, डिलाईल रोड, लोअर परळ, करी रोडमधील रहिवाशांची मोठी गैरसोय होत होती. नव्याने बांधलेल्या पुलावर फुटपाथ (पोचरस्ता) बांधण्यात येत असून येत्या 10 ते 12 दिवसांत तो रहिवाशांसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले.

स्मशानभूमीच्या नूतनीकरणात बदल

वरळी येथील हिंदू स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, काही वेळा तेथे धूर कोंडला जात होता तसेच इतर काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात आता बदल केले जाणार आहेत. त्याचबरोबर बंद असलेल्या इतर शवदाहिन्याही सुरू करण्यात येणार आहेत.