कोस्टल रोडच्या आजुबाजुच्या परिसराचे हरित संवर्धन व्हायला हवे, आदित्य ठाकरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र

”कोस्टल रोड प्रकल्पाच्या आजूबाजूला पर्यावरणपूरक हरित क्षेत्र निर्माण करण्याची गरज आहे. याबाबतची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून केली आहे. या कामासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांची मदत घेतली पाहिजे असेही त्यांनी या पत्रातून सुचवले आहे.

”आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार साकार होत असलेला ‘कोस्टल रोड’ हा केवळ शहराच्या वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचाच नव्हे तर शहराच्या सुशोभीकरणाचाही कायापालट करणारा होता. ‘कोस्टल रोड’ म्हणजे जागतिक दर्जाचे रस्ते, पादचारी मार्ग, सायकलिंग ट्रॅक आणि मोठ्या मोकळ्या हिरव्यागार जागा असा मुंबईकरांसाठीचा समृद्ध प्रकल्प होता. शिवाय, पर्यावरण पूरक उपायांमधून हवामान बदलाला रोखणारा आणि पर्यावरणाची काळजी घेणारा प्रकल्प ठरला आहे. हे लक्षात घेऊन, मी तुम्हाला विनंती करतो की, कोस्टल रोडची वाहतूक वगळता इतर ठिकाणांचे हरित संवर्धन करत उत्तम प्रकारे सुशोभीकरण कसे करता येईल हे ठरवण्यासाठी जागतिक स्तरावरील स्पर्धा आयोजित करा. या कामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञांची व पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थाची मदत घ्या. तसेच दक्षिण मुंबईचे खासदार आणि वरळी आणि ताडदेवचे आमदार यांच्यासह स्थानिक निवडून आलेले लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवाशी संस्था/समुदाय यांच्याकडून या जागांचा सर्वोत्तम वापर कसा करता येईल याब‌द्दल सूचना मागवाव्यात, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रातून म्हटले आहे.

”हा प्रकल्प मूळतः कोस्टल रोडसाठी नियोजित असलेल्या आणि राखून ठेवलेल्या निधीतूनच झाला पाहिजे. हा एक शहरातील प्रकल्प आहे, जो संपूर्णपणे मुंबई महानगरपालिकेने राबवलेला आहे. मुंबई महानगरपालिका रेसकोर्सवरील खाजगी तबेल्यांवर 100 कोटी खर्च करणे टाळू शकते आणि तो निधी इथेही वापरू शकते. माझ्या विनंतीचा तुम्ही नक्की विचार कराल अशी आशा करतो. आणि या जागांचे नियोजन कशा प्रकारे व्हावे याबद्दल कंत्राटदारांचे नव्हे तर मुंबईकरांचे म्हणणे ऐकले जाईल अशी अपेक्षा करतो, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.