
मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न आहे, आता माघार नाही, जाब विचारावाच लागेल. मुंबईतील पाणी प्रश्नावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पाण्याविना मुंबईकरांचे हाल होत असतानाही सरकारकडून अपेक्षित पावले उचलली जात नसल्याने उद्यापासून शिवसेना आणि मुंबईकर नागरिक मिळून महानगरपालिका कार्यालयांवर धडक मोर्चे नेतील, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला. मुंबईच्या पाणी प्रश्नासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नेते, उपनेते, महिला आघाडी आणि पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवन येथे बैठक झाली. त्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेनेने मुंबईतील गढूळ पाणी, कमी दाबाने येणारे पाणी आणि टँकर असोसिएशनने ऐन उन्हाळ्यात पुकारलेल्या संपाचा मुद्दा सातत्याने लावून धरलेला आहे. टँकर असोसिएशनने एक आठवडय़ाची नोटीस देऊनही सरकार हलले नाही. या संपावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने 48 तासांची डेडलाइन दिली होती.